नागपूर,दि.२: MLC Election Result: नागपुरात भाजपला धक्का बसला आहे. नागपूर विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठीच्या मतमोजणीला गुरुवारी सकाळी ८ वाजतापासून सुरुवात झाली. येथे २२ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. मतमोजणीपूर्वी प्रमुख उमेदवार व नेत्यांनी विजयाबद्दल दावे केले होते. भाजप समर्थित शिक्षक परिषदेचे उमेदवार नागो गाणार हे विजयाची हॅट्ट्रिक मारतात की सुधाकर अडबाले, राजेंद्र झाडे परिवर्तन घडवतात, याकडे शिक्षकांसह राजकीय वतुर्ळाचे लक्ष लागले होते. हॅट्ट्रीकपूर्वीच नागो गाणार यांची विकेट पडली आहे. याठिकाणी महाविकास आघाडीचे सुधाकर अडबोले विजयी झाले आहेत. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी याबाबत माहित दिली.
सुधाकर अडबोले विजयी | MLC Election Result
नागपूर मतदारसंघातील सहा जिल्ह्यांमध्ये सरासरी ८६.२६ टक्के मतदान झाले होते. ३९ हजार ८३४ पैकी ३४ हजार ३५९ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. अजनी येथील समुदाय भवनात सकाळी ७:३० वाजता मतपेट्या बंद केलेली स्ट्राँगरूम उघडण्यात आल्या. प्रत्यक्ष मतमोजणीस सकाळी ८ वाजतापासून सुरुवात झाली. तत्पूर्वी, निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त डॉ. विजयलक्ष्मी बिदरी मतमोजणी केंद्रावर उपस्थित मतमोजणी अधिकारी, उमेदवार व त्यांचे प्रतिनिधी आदींना गोपनीयतेची शपथ देण्यात आली होती. सर्वांनाच उत्सुकता लागलेल्या नागपूर मतदारसंघात अखेर महाविकास आघाडीचे सुधाकर अडबोले विजयी झाले आहेत.
नाना पटोले यांनी दिली माहिती
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन यासंदर्भात माहिती दिली. तसेच, भाजपच्या मातृसंस्थेच्या बालेकिल्ल्यातच महाविकास आघाडीचा भाजपला दणका बसला, अशा शब्दात भाजपवर टीकाही केली.
पहिल्या फेरीच्या मतमोजणीत अडबाले यांना १४०७१ तर गाणार यांना ६३०९ मते मिळाली. एकूण ७ हजाराहून अधिक मतांनी अडबाले आघाडीवर आहेत. पहिल्या फेरीत मतांचा कोटा पूर्ण करीत विजयावर शिक्कामोर्तब केले. दहा वर्षापासून भाजपकडे असलेली नागपूरची जागा महाविकास आघाडीने जिंकली भाजपने गाणार यांची निवडणूक प्रतिष्ठेची केली होती, फडणवीस, गडकरी यांनी त्यांच्यासाठी प्रचारसभा घेतल्या होत्या. दरम्यान, पहिल्या फेरीत अडबाले यांनी निर्णायक आघाडी घेतल्याने त्यांच्या समर्थकांनी जल्लोष सुरू केला आहे.