आमदार अपात्रता सुनावणीचा शेवटचा दिवस, या तारखेपर्यंत निर्णयाची अपेक्षा

0

मुंबई,दि.20: शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाची विधानसभा अध्यक्षांसमोरील सुनावणी अखेर तीन महिन्यानंतर आज पूर्ण झाली. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद, याचिका एकत्रित करणे, त्यानंतर शिवसेना शिंदे गट आणि ठाकरे गट या दोन्ही गटांच्या आमदारांची उलट तपासणी घेऊन साक्ष नोंदवणे आणि अंतिम सुनावणीतील दोन्ही बाजूंचा युक्तिवाद असं करत ही सुनावणी पूर्ण करण्यात आली आहे. आता प्रतीक्षा असणार आहे ती अध्यक्षांकडून देण्यात येणाऱ्या या प्रकरणातील निर्णयाची.

या संपूर्ण सुनावणी प्रक्रियेमध्ये दोन्ही बाजूंकडून अनेक दावे-प्रतीदावे, आरोप प्रत्यारोप करण्यात आले. हजारांच्या जवळपास प्रश्न आणि उपप्रश्न दोन्ही बाजूंनी विचारण्यात आले.

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर सुनावणी

शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणातील सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीनंतर 11 मे रोजी अंतिम निकाल दिला. अपात्रता प्रकरणात विधानसभा अध्यक्षांनी तातडीने सुनावणी घेऊन आमदार अपात्रता प्रकरणातील निकाल देण्याचे निर्देश विधानसभा अध्यक्षांना दिले. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर तीन महिन्यांनी म्हणजेच खऱ्या अर्थाने 14 सप्टेंबरला शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणातील विधानसभा अध्यक्षांसमोरील सुनावणी सुरू झाली. यामध्ये अध्यक्षांसमोर दोन्ही गटाच्या बाजू भक्कमपणे मांडण्यासाठी वकिलांची फौज लावण्यात आली.

14 सप्टेंबरला सुनावणी सुरू झाल्यानंतर दोन्ही बाजूंच्या वकिलांकडून दोन्ही बाजूंनी दाखल करण्यात आलेल्या 34 याचिका एकत्रित घेण्यावरून जोरदार युक्तिवाद झाला.

अध्यक्षांकडे दाखल झालेल्या सर्व याचिकांचा विषय, मूळ गाभा हा एकच असल्याने एकत्रित या याचिकावर सुनावणी घेऊन तातडीने निर्णय अध्यक्षांनी द्यावा असा युक्तिवाद ठाकरे गटाकडून करण्यात आला.

तर प्रत्येक आमदाराला आपले म्हणणे मांडण्याचा अधिकार असून अपात्रतेची कारवाई करण्याआधी आमदारांच्या बाजू सुनावणी दरम्यान मांडण्यास परवानगी द्यावी असा युक्तिवाद शिंदे गटाकडून करण्यात आला.

ज्यामध्ये वेळ काढूपणा होत असल्याचा आरोप ठाकरे गटाच्या वकिलांकडून करण्यात आला आणि त्यानंतर एका मर्यादित वेळेत निकाल देण्यासंदर्भात अध्यक्षांनी पाऊलं उचलावी या संदर्भातील मुद्दा ठाकरे गटाकडून सर्वोच्च न्यायालयात मांडण्यात आला.

त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर विधानसभा अध्यक्षांनी 34 विविध याचिका या सहा गटांमध्ये एकत्रित करून सगळ्या प्रकरणातील सुनावणीचे वेळापत्रक 20 ऑक्टोबरला जाहीर केलं.

सहा गटामध्ये याचिका एकत्रित केल्यानंतर विधानसभा अध्यक्षांना पुढील सुनावणी घेण्यास फायदेशीर झालं. दोन्ही गटांच्या वकिलांना पुरावे साक्ष आणि प्रतिज्ञापत्र अध्यक्षांकडे सादर करण्यासाठी पुरेसा वेळ देण्यात आला आणि मग खऱ्या अर्थाने दोन्ही गटाच्या आमदार खासदारांच्या उलट तपासणीला आणि साक्ष नोंदवायला सुरुवात झाली. या प्रकरणातील विविध मुद्द्यांवर दोन्ही बाजूंनी उलट तपासणीमध्ये उलगडा करण्यास सुरुवात झाली.

ठाकरे गटाच्या आमदारांची उलट तपासणी

22 नोव्हेंबर पासून ठाकरे गटाच्या उलट तपासणीमध्ये शिवसेना ठाकरे गटाचे प्रतोद सुनील प्रभू यांना शिवसेना शिंदे गटाची वकील महेश जेठमालांनी यांनी प्रश्न उपप्रश्न विचारायला सुरुवात केली. साधारणपणे दीड आठवडा ही उलट तपासणी सुरू राहिली.

शिंदे गटाच्या आमदारांची उलट तपासणी

सुनील प्रभू यांच्या उलट तपासणीनंतर शिवसेना ठाकरे गटाचे वकील देवदत्त कामत यांनी शिवसेना शिंदे गटाचे आमदार आणि खासदारांच्या उलट तपासणीला सुरुवात करताना प्रश्नांचा भडीमार केला. शिवसेना शिंदे गटाने महाविकास आघाडीचे सरकार पाडण्याचा आणि एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करण्याचा डाव आखला होता आणि हा एक नियोजित राजकीय कट होता हे रेकॉर्डवर आणण्याचा आपल्या प्रश्नांमध्ये रेकॉर्डवर आणण्याचा त्यांनी प्रयत्न केला आणि तशा प्रकारची प्रश्न शिंदे गटाच्या आमदार खासदारांना विचारले.

10 जानेवारीपर्यंत निर्णयाची अपेक्षा

आता या सगळ्या दोन्ही बाजूच्या युक्तिवादानंतर आणि उलट तपासणी आणि साक्षी नोंद दिल्यानंतर 10 जानेवारीपर्यंत या सगळ्या प्रकरणाचा निकाल अपेक्षित आहे. दोन्ही गटाने आपल्या बाजू भक्कमपणे मांडली जावी यासाठी जोरदार युक्तिवाद केला, लेखी युक्तिवाद सादर केले. आता निर्णय घ्यायची वेळ आहे विधानसभा अध्यक्षांवर. कारण अध्यक्षांच्या या निर्णयाकडे राज्यासोबत संपूर्ण देशाचे लक्ष असणार आहे आणि हा निर्णय एक प्रकारे ऐतिहासिक ठरेल असं राजकीय आणि विधी तज्ज्ञांचं म्हणणं आहे. त्यामुळे आता प्रतीक्षा आहे या प्रकरणातील निर्णयाची.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here