विधानसभा निवडणुका जाहीर होताच मनोज जरांगे पाटील यांनी केली मोठी घोषणा

0

मुंबई,दि.15: महाराष्ट्रात 20 नोव्हेंबरला मतदान होणार असून 23 तारखेला निकाल लागणार आहेत. विधानसभा निवडणुका जाहीर होताच मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मोठी घोषणा केली आहे. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याचा, तसेच सगेसोयरेबद्दल अधिसूचना काढण्याचा निर्णय विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी घ्या, असा इशारा मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी दिला होता.

जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला आवाहन केलं आहे. विधानसभा निवडणुकीत भाजपाचा सुपडा साफ केल्याशिवाय राहाणार नाही, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे. मनोज जरांगे पाटील माध्यमांशी बोलताना म्हणाले, “मराठ्यांना बेचिराख करण्याचं काम केलं आहे. आमची आयुष्ये उद्ध्वस्त झाली पाहिजे, यासाठी प्रयत्न झाला. मराठ्यांनी त्यांना सत्तेवर बसवलं, त्याच मराठ्यांना बेचिराख कसं करता येईल, यासाठी सगळा सत्तेचा वापर देवेंद्र फडणवीसांनी मराठ्यांच्या विरोधात केला.”

तुम्हाला खुर्चीवर बसू द्यायचं की नाही हे मराठ्यांच्या हातात आहे, या महाराष्ट्रात मराठ्यांना बाजूला ठेऊन ते कधीच सत्तेत येऊ शकत नाहीत असा इशाराही मनोज जरांगे यानी दिला आहे. 

सभेला तुम्ही एकजूट दाखवली आता मतदानाला ताकद दाखवा, मराठ्यांचं शंभर टक्के मतदान झालं पाहिजे, माता-माऊलींसह, पुरुष, विद्यार्थी सर्वांनी मतदान करा, एकही मत वाया जाता कामा नये, असं आवाहन जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला केलं आहे. शेवटी अस्तित्वाची लढाई आपल्या मुलांसाठी आहे, आता धुरा तुमच्या खांद्यावर आहे, असंही जरागे पाटील यांनी म्हटलं आहे. 


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here