धाराशिव,दि.10: मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपाला इशारा दिला आहे. मराठा समाजाला ओबीसींच्या कोट्यातून आरक्षण मिळावं, अशी मागणी लावून धरणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांनी विधिमंडळात घडलेल्या घडामोडींवरून सत्ताधारी महायुती आणि विरोधी पक्षातील महाविकास आघाडी या दोघांवरही जोरदार टीका केली आहे. ”सत्ताधारी आणि विरोधक दोघेही आमच्याविरोधात आहेत, सभागृहात गोंधळ घालण्यापेक्षा आरक्षण द्या”, असे मनोज जरांगे पाटील यांनी सुनावले.
मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा मुद्द्यावरून आज विधिमंडळाच्या अधिवेशनामध्ये सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये दोन्ही सभागृहात जोरदार खडाजंगी झाली. देशात केवळ मराठ्यांच्या नोंदी सरकारी आहेत. बाकी कोणाच्या नोंदी सरकारी नाहीत. मुख्यमंत्री साहेब, एकही नोंद रद्द केली तर याद राखा. तुमचे 288 आमदार पाडले म्हणून समजा”, असा मोठा इशारा मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिला.
मनोज जरांगे पाटील यांनी आज धाराशिवच्या सभेत मंत्री छगन भुजबळ आणि मंत्री गिरीश महाजन यांच्यावर निशाणा साधला. यावेळी त्यांनी आणखी एक महत्त्वाचं वक्तव्य केलं. “राष्ट्रवादी, काँग्रेस, शिवसेनेच्या श्रीमंत मराठ्यांना आरक्षण लागत नाही. त्यांच्या मुलांना आरक्षणाची गरज नाही”, असं मोठं वक्तव्य मनोज जरांगे पाटील यांनी केलं.
आरक्षणासंदर्भात चर्चा करण्यासाठी सरकारने बोलावलेल्या बैठकीला विरोधी पक्षांच्या नेत्यांनी दांडी मारली होती. त्याबाबत प्रतिक्रिया देताना मनोज जरांगे पाटील म्हणाले की, ते बैठकीला येणार नाहीत, हे आम्हाला माहिती होते. विरोधकही आमच्या विरोधात आहेत आणि सत्ताधारीही आमच्याविरोधात आहेत. यांना बाकीच्या गोष्टी करायला वेळ आहे. मात्र मराठ्यांबाबतच्या बैठकीला जाण्यासाठी वेळ नाही आहे. मराठ्यांचं आरक्षण ओबीसींमधून द्या, अशी मागणी विरोधी पक्षाच्या नेत्यांनी लावून धरण्याची गरज होती. मराठ्यांचा नुसता उपयोग करून घेऊ नका, असा इशारा जरांगे पाटील यांनी दिला.
पण भुजबळचं ऐकून तुम्ही भाजपचं नुकसान करून घेऊ नका
“भुजबळच्या नादात तुमच्यावर वाईट वेळ येईल. ओबीसी मतांची गरज आहे म्हणून ओबीसीला जवळ कराल. पण भुजबळचं ऐकून तुम्ही भाजपचं नुकसान करून घेऊ नका. मी लोकसभेला केवळ पाडा म्हणालो. आता नाव घेऊन बोललो तर अवघड होईल. सन्मान घ्यायला दुसऱ्याचा सन्मान करावा लागतो. मराठ्यांची सत्ता येणार आणि त्यावेळी जातीवादी अधिकाऱ्यांचा हिशोब होणार म्हणजे होणार. जातीवाद करणाऱ्या अधिकाऱ्यांना आणून बसवले. ज्यांनी आमच्यावर गोळ्या झाडल्या त्या अधिकाऱ्यांना बडतर्फ करण्याऐवजी बढती दिली”, असा आरोप मनोज जरांगे यांनी केला.