मुंबई,दि.१४: राष्ट्रवादीचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे. सुप्रीम कोर्टात प्रलंबित असलेला महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावरील निकाल गेल्या महिन्यात जाहिर करण्यात आला. या निकालात सुप्रीम कोर्टाने उद्धव ठाकरेंचं सरकार पुनर्स्थापित करता येत नाही असं म्हटलं. तसेच आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय आपल्या अखत्यारित येत नसून तो विधानसभा अध्यक्षांकडे सोपवण्यात आला आहे. विधानसभेचे अध्यक्ष हे मुख्य प्रतोद आणि आमदारांच्या अपात्रतेबाबत निर्णय घेतील. दरम्यान, सुप्रीम कोर्टाच्या या निकालाबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी वक्तव्य केलं आहे.
शिंदे गटाने भरत गोगावले यांची प्रतोदपदी केलेली नियुक्ती बेकायदेशीर असल्याचा निकाल न्यायालयाने दिला होता. प्रतोद हा पक्ष ठरवत असतो, विधिमंडळातील आमदार नाही असेही न्यायालयाने स्पष्ट मत व्यक्त केले होते.
काय म्हणाले जितेंद्र आव्हाड?
जितेंत्र आव्हाड म्हणाले, विधानसभेत व्हीप कोणाचा असेल, लीडर ऑफ हाऊस कोणाचा असेल याबाबत सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटलंय हे जाणून घेतल्यापासून देवेंद्र फडणवीस या विषयावर एकही शब्द बोलत नाहीत. देवेंद्रजींचं एकच म्हणणं असतं. जितेंद्र ना… जितेंद्रला काही कळतच नाही. परंतु सर्वोच्च न्यायालयाचा निकाल हा त्या हुशार माणसाने व्यवस्थित समजून घेतला आहे. त्यांच्या चेहऱ्यावर तो दिसतोय.
दरम्यान, एकनाथ शिंदे यांच्या वर्तमान पत्रातील जाहिरातीवरही आव्हाड बोलले. जितेंद्र आव्हाड म्हणाले, या जाहिरातीनंतर हा निकाल (आमदार अपात्रतेचा) लागलाच पाहिजेच ही भूमिका त्यांची असेल. आपण किती मोठ्या राक्षसी महत्त्वकांक्षेला खतपाणी घालतोय हे ही राजकारण्यांनी कायम लक्षात ठेवावं. मी आणि एकनाथ शिंदे राजकारणात एकत्र आलो. तो मला ज्युनियर होता. पण एक माणूस राक्षसी महत्त्वकांक्षेने एका मोठ्या राजकीय पक्षाला संपवून टाकतो हे मात्र मराठी म्हणून मला पटत नाही.