उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का, निवडणूक आयोग पक्षचिन्हाचा निर्णय घेणार

0

नवी दिल्ली,दि.27: शिवसेनेमध्ये (Shivsena) बंडखोरी झाल्यामुळे शिवसेना कुणाची असा प्रश्न निर्माण झाला आहे. या प्रकरणावर अखेर सर्वोच्च न्यायालयामध्ये घटनापीठासमोर सुनावणी सुरू झाली आहे. शिवसेना कुणाची, पक्षचिन्ह कुणाला मिळणार याबाबत आता केंद्रीय निवडणूक आयोग निर्णय घेणार असून त्याला सर्वोच्च न्यायालयाने ग्रीन सिग्नल दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाच्या कार्यवाहीवर कोणतीही स्थगिती देण्यास नकार दिला आहे. त्यामुळे हा ठाकरे गटाला मोठा धक्का असल्याचं सांगितलं जातंत तर शिंदे गटाला यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे.

शिवसेना कुणाची आणि पक्षचिन्हावर कुणाचा अधिकार याचा निर्णय आता केंद्रीय निवडणूक आयोगाला घेता येणार आहे. या प्रकरणाचा निकाल लागेपर्यंत निवडणूक आयोगाच्या कार्यवाहीला स्थगिती देण्यात यावी अशी मागणी ठाकरे गटाकडून करण्यात आली होती. त्याला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे.

या आधी ठाकरे गटाला आपली कागदपत्रं जमा करण्याचे निर्देश हे निवडणूक आयोगाने दिले होते. त्यावर ठाकरे गटाकडून दोन वेळा मुदतवाढीची मागणी केली होती. ही लढाई सर्वोच्च न्यायालयात असल्याने निवडणूक आयोगाच्या कार्यवाहीला स्थगिती देण्यात यावी अशी मागणी शिवसेनेकडून करण्यात आली होती.

आता सर्वोच्च न्यायालयाच्या ग्रीन सिग्नलनंतर शिवसेनेच्या पक्षचिन्हाचा निर्णय केंद्रीय निवडणूक आयोग घेणार आहे. त्यानंतर आता ठाकरे गटाच्या वतीनं कागदपत्रं जमा करण्यासाठी पुन्हा मुदतवाढ मागण्यात येणार का हे पाहावं लागेल.

शिवसेना कुणाची याचा निर्णय येत्या महिना किंवा दीड महिन्यात लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. आगामी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या आधी हा निर्णय घेण्यात येण्याची शक्यता आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here