नवी दिल्ली,दि.२८: Maharashtra Crisis: सर्वोच्च न्यायालयात राज्यातील सत्तासंघर्षावर सुनावणी सुरू आहे. न्यायालयात ठाकरे गटाकडून ॲड. देवदत्त कामत यांनी जोरदार युक्तिवाद केला. ३ जुलैला विधानसभा अध्यक्षांच्या आदेशाने भरत गोगावलेंनी सुनील प्रभूंना पत्र पाठवून त्यांना प्रतोदपदावरून काढल्याची माहिती दिली. तसेच, विधानसभा अध्यक्षांच्या परवानगीने एकनाथ शिंदेंना विधिमंडळ पक्षनेतापदी नियुक्ती झाल्याची माहिती या पत्रात दिली होती असे कामत म्हणाले.
एकनाथ शिंदेंच्या एका पत्राच्या आधारावर विधानसभा अध्यक्षांनी सुनील प्रभू यांच्याऐवजी भरत गोगावलेंची प्रतोदपदी नियुक्ती झाल्याच्या निर्णयाला मान्यता दिली असे देवदत्त कामत म्हणाले.
भरत गोगावलेंनी सुनील प्रभूंना ३ जुलै रोजी पाठवलेलं पत्र राजकीय पक्ष म्हणून पाठवलं नव्हतं. त्या पत्राच्या शेवटी ‘शिवसेना विधिमंडळ पक्ष’ असा उल्लेख होता. त्यामुळे प्रतोदची निवड राजकीय पक्ष करू शकतो की विधिमंडळ गट हा मुद्दा इथे महत्त्वाचा ठरतो असे कामत म्हणाले.
Whip ची नियुक्ती करणं हे संसदीय काम नाही | Maharashtra Crisis
प्रतोद (Whip) नियुक्त करणं हे संसदीय प्रणालीतलं काम नाही. मुळात हे सगळं प्रकरण प्रक्रियेमधील गैरव्यवहाराचं नसून प्रत्यक्ष राज्यघटनेच्या उल्लंघनाचं आहे. असा कामत यांचा सर्वोच्च न्यायालयात युक्तिवाद.
राजकीय पक्ष म्हणजे काय? कोणत्याही राजकीय पक्षाचे निर्णय हे त्यांच्या नेतृत्वाच्या माध्यमातून जाहीर केले जातात, असे कामत म्हणाले.
राजकीय पक्ष याचा अर्थ नेतृत्वाकडून आलेले निर्देश असा होतो
राजकीय पक्ष हे काही नियमबाह्य पद्धतीने काम करत नाहीत. पक्षांमध्ये कोण सदस्य आहेत, कोण प्रमुख आहे, पक्षाची रचना काय आहे हे सगळं स्पष्ट असतं. त्यामुळे जेव्हा दहाव्या परिशिष्टामध्ये राजकीय पक्षाचे निर्देश असा उल्लेख असतो, तेव्हा त्याचा अर्थ संबंधित पक्षाच्या नेतृत्वाकडून आलेले निर्देश असा होतो असा युक्तिवाद कामत यांनी केला.
जेव्हा एखादा पक्षांतर्गत वाद निर्माण होतो, तेव्हा एखादा आमदार अशी भूमिका घेऊ शकतो का की आता मी राजकीय पक्ष आहे आणि मी दहाव्या परिशिष्टामध्ये बंधनं घातलेल्या पद्धतीने व्यवहार करू शकतो? असा युक्तिवाद कामत यांनी केला.