मुंबई,दि.3: केंद्रीय निवडणूक आयोगाने नुकताच महाराष्ट्र दौरा केला. यानंतर त्यांनी शनिवारी (28 सप्टेंबर) पत्रकार परिषद घेतली. केंद्रीय निवडणूक आयोगाने जवळपास 11 राजकीय पक्षांसोबत बैठक घेतली. यात दिवाळी आणि इतर उत्सवाला लक्षात घेता निवडणूक जाहीर करण्यात यावी अशी नेत्यांची भूमिका होती. तसेच मतदारांसाठी व्यवस्था करण्यात यावी अशी मागणी पक्षाकडून करण्यात आली. त्यामुळे दिवाळीनंतरच महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका होतील असे स्पष्ट झाले आहे.
विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीची सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. राज्यातील निवडणूक यंत्रणेची तयारीही अंतिम टप्प्यात पोहचली आहे. जम्मू-कश्मीर आणि हरियाणा विधानसभा निवडणुकीच्या निकालाची घोषणा झाल्यावर दोनच दिवसांत केंद्रीय निवडणूक आयोगाकडून 10 ऑक्टोबरला महाराष्ट्र आणि झारखंड विधानसभा निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्रात मागील काही दिवसांपासून राज्य मंत्रिमंडळाच्या वरचेवर होत असलेल्या बैठका आणि बैठकांमधील सरकारचा निर्णयांचा धडाका पाहता पुढील आठवडय़ात विधानसभा निवडणुकीची घोषणा होण्याची दाट शक्यता आहे. जम्मू-कश्मीर आणि हरियाणा राज्यातील विधानसभा निवडणुकीचा निकाल 8 ऑक्टोबरला जाहीर होणार आहे. त्यानंतर 10 ऑक्टोबरला महाराष्ट्र आणि हरियाणा विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीची घोषणा केंद्रीय आयोग करेल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे.