मुंबई,दि.२३: महाराष्ट्र बातमी | वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्याबाबत राष्ट्रवादीचे नेते विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मोठं विधान केलं आहे. प्रबोधनकार डॉट कॉम या संकेतस्थळाच्या उद्धाटनप्रसंगी प्रकाश आंबेडकर आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे एकत्र आले होते. वंचितनं २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत ३५ लाखांहून अधिक मतं घेतली. परिणामी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या १० ते १२ जागांवर परिणाम झाला.
पुढे महाराष्ट्रात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या पक्षांनी एकत्र येत महाविकास आघाडी सरकारचा प्रयोग केला. हा प्रयोग अडीच वर्ष चालला. शिवसेनेत एकनाथ शिंदे यांनी ४० आमदारांसह १३ खासदारांसोबत बंड केलं. राज्यात आता शिंदे गट आणि भाजपचं सरकार आहे. मुंबईत एका कार्यक्रमात उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर एकत्र आले होते. त्यानंतर महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात विविध चर्चा सुरु झाल्या आहेत.
राज्यातील सत्तांतरानंतर भाजपा आणि शिंदे गटाला शह देण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडून नियोजनबद्ध पावले टाकण्यात येत आहे. प्रबोधनकार डॉट कॉम संकेतस्थळाच्या लोकार्पण सोहळ्यावेळी उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर हे एकाच मंचावर असणे, त्याच दिशेने टाकलेले आणखी एक पाऊल आहे. यावेळी दोन्ही नेत्यांनी आगामी काळात युती करण्याचे स्पष्टपणे संकेत दिले.
शिवसेना महाविकास आघाडीत असल्याने काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या भूमिकेकडे लक्ष लागलं होतं. पण, काँग्रेसबरोबर अनेकवेळा युतीबाबत चर्चा केल्याचं प्रकाश आंबेडकर यांनी सांगितलं होतं. त्यामुळे राष्ट्रवादीची भूमिका काय असेल, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या होत्या. अशात विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.
अजित पवार म्हणाले, “मतांची विभागणी टाळण्यासाठी समविचारी पक्षांबरोबर येण्याची आमची तयारी आहे. मात्र, दोन्हीबाजूने तयारी असावी लागते. राज्यात आंबडेकर गट, गवई गट, कवाडे गट, आठवले गट आहेत. यातील अनेकांबरोबर आघाडी करून निवडणुका लढल्या आहेत. रामदास आठवले यांची केंद्रात मंत्री होण्यापूर्वी आमच्याबरोबर आघाडी असायची. आर आर पाटील यांनी प्रकाश आंबेडकर यांच्याबरोबर चर्चा केली होती. त्यामुळे आम्ही चर्चा करण्यासाठी तयार आहोत,” असे अजित पवारांनी स्पष्ट केलं.
“देशात लोकशाही टिकवण्यासाठी, स्वातंत्र्य अबाधित राखण्यासाठी केवळ लोकांना जागे करुन चालणार नाही. तर, यासाठी एकत्र येऊन काम करण्याची वेळ आली आहे. देश गुलामगिरीकडे चालला असताना आपण नुसते बघत राहणार असू तर आपल्याला आजोबांचे नाव घेण्याचा अधिकार राहणार नाही,” असे सांगत उद्धव ठाकरेंनी प्रकाश आंबेडकर यांना साद घातल नवीन राजकीय समीकरणाचे संकेत दिले होते.