राज ठाकरे यांना महंतांचे चॅलेंज, ‘छटी का दुध याद दिलाएंगे’

0

दि.10: मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) लवकरच अयोध्या दौरा करणार आहेत. या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर भाजप खासदार खासदार बृजभूषण सिंह (Brijbhushan Singh) यांनी विरोध दर्शवला आहे. आधी मराठीच्या मुद्द्यांवर उत्तर भारतीयांना लक्ष्य करणाऱ्या राज ठाकरे यांनी भूमिका बदलत हिंदुत्वाचा मुद्दा उचलला. मात्र, त्यांच्या जुन्या भूमिका आजही त्यांच्या हिंदुत्वाच्या नव्या राजकारणाला आव्हान देताना दिसत आहेत. उत्तर प्रदेशमध्ये भाजपा खासदार ब्रिजभूषण सिंह यांच्या नेतृत्वात राज ठाकरे यांच्या 5 जुनच्या अयोध्या दौऱ्याला जोरदार विरोध होत आहे.

उत्तर प्रदेशमधील नंदिनी नगर येथे आयोजित सभेत महंतांनी राज ठाकरे यांना एका आठवड्यात माफी मागा, अन्यथा ‘छटी का दुध याद दिलाएंगे’ असा थेट इशारा दिलाय. ते एबीपी माझाशी बोलत होते. बृजभूषण सिंह यांनी राज ठाकरे यांच्या दौऱ्याला विरोध दर्शवत स्थानिक साधूसंत आणि महंतांच्या उपस्थितीत रॅली काढली.

सभेत उपस्थित महंत म्हणाले, “माझ्या हातात धर्मदंड आहे. आम्ही राज ठाकरे यांना हे सांगायला आलो आहोत की त्यांनी याआधी उत्तर भारतीयांचा जो अपमान केलाय त्यासाठी त्यांनी माफी मागावी. राज ठाकरे यांनी माफी मागितली, तर त्यांचं स्वागत होईल. त्यांनी माफी मागितली नाही, तर त्यांना ‘छटी का दुध याद दिलाएंगे’. उत्तर भारतीयांचा अपमान करणारा कोणीही ‘माई का लाल’ जन्माला आलेला नाही.”

राज ठाकरे यांनी माफी मागितली नाही तर —

“राज ठाकरे यांनी माफी मागितली नाही, तर त्याचं वेगळ्या पद्धतीने स्वागत केलं जाईल. आमची त्यासाठी संपूर्ण तयारी आहे. उत्तर भारतीयांचा जनसुमदाय राज ठाकरे ज्या दिवशी उत्तर प्रदेशमध्ये येतील त्या दिवसाची वाट पाहत आहे. माझ्या हातातील धर्मदंड देशद्रोहींना सुधारेल आणि देशप्रेमींचं संरक्षण करेल. त्यासाठीच आमच्याकडे धर्मदंड असतो,” असंही या महंतांनी सांगितलं.

माफी मागावी

यावेळी बृजभूषण यांनी राज ठाकरेंवर निशाणा साधत म्हटलं आहे की, ‘राज ठाकरेंनी उत्तर भारतीयांवर केलेला अत्याचार आम्ही विसरणार नाही. साधूसंतांनी राज ठाकरेंना माफ केलं तरच राज यांनी अयोध्येत प्रवेश देण्याबद्दल विचार करू. राज ठाकरे यांनी उत्तर भारतीयांच्या भावना दुखावल्या आहेत. साधूसंत आणि अयोध्यावासी राज ठाकरे यांच्यावर नाराज आहेत. त्यामुळे राज ठाकरे यांनी उत्तर भारतीयांची माफी मागावी.’


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here