दि.22 : अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत नरेंद्र गिरी यांनी आत्महत्त्या केल्यामुळे हळहळ व्यक्त होत आहे. सगळ्यांना सन्मार्गाला लावणारा संत कशी आत्महत्त्या करू शकतो? असा प्रश्न अनेकांना पडला होता. महंत नरेंद्र गिरी यांनी स्वतः लिहिलेल्या सुसाइड नोटमध्ये त्यांच्या आत्महत्येला त्यांचे शिष्य स्वामी आनंद गिरी जबाबदार असल्याचा आरोप केला आहे.
मीडिया अहवालानुसार, स्वामी आनंद गिरी यांनी कम्प्युटरच्या साहाय्याने एका मुलीसोबत आपला फोटो मॉर्फ करून ते आपल्याला ब्लॅकमेल करत होतो, असं महंत नरेंद्र गिरी यांनी लिहिलं आहे. तसंच, हा मॉर्फ केलेला फोटो ते व्हायरल करणार होते, असंही त्यांनी लिहिलं आहे. ‘मी माझं संपूर्ण आयुष्य सन्मानाने जगलो. हा फोटो सगळीकडे पसरला, तर समाजात मी सन्मानाने जगू शकणार नाही. त्यापेक्षा मरणं बेहत्तर,’ अशी भावना त्यांनी आपल्या पत्रात व्यक्त केली आहे. 13 सप्टेंबरलाही आपण आत्महत्येचा प्रयत्न केल्याचं त्यांनी त्यात लिहिलं आहे.
महंत नरेंद्र गिरी यांची सुसाइड नोट पोलिसांकडे आहे. त्यात त्यांनी असं लिहिलं आहे, की ‘आनंद गिरीमुळे मी आज व्यथित झालो. हरिद्वारमधून मला कळलं, की तो एका मुलीसोबत माझा फोटो कम्प्युटरच्या साहाय्याने जोडून वाईट काम करत असल्याचं दर्शवणारा तो व्हायरल करणार आहे आणि मला बदनाम करणार आहे. मी असा विचार केला, की एकदा बदनाम झालो, तर कुठे कुठे स्पष्टीकरण देत राहू? बदनाम झालो, तर ज्या पदावर आहे त्या पदाची प्रतिष्ठाही धुळीला मिळेल. त्यापेक्षा मरून जाणंच श्रेयस्कर आहे. मी मेल्यानंतर तरी सत्य समोर येईलच. मी आजपर्यंत समाजात सन्मानाने राहिलो आहे. बदनामी झाली, तर या समाजात मी राहू कसा? त्यापेक्षा मरणं बेहत्तर.’