प्रयागराज,दि.१०: महाकुंभ मेळ्यात भाविकांची गर्दी मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहे. देश विदेशातून भाविक लाखोंच्या संख्येने प्रयागराजमध्ये दाखल होत आहेत. प्रयागराजमध्ये भाविकांचा अक्षरशः महासागर उसळला. वीकेण्डच्या सुट्टीमुळे देशभरातील भाविक महाकुंभसाठी दाखल होत आहेत.
प्रयागराजच्या दिशेने जाणारे रस्ते जाम झाले आणि लाखो भाविक 12 तासांहून अधिक काळ अडकून पडले. तब्बल 25 किलोमीटरपर्यंत गाडय़ांच्या रांगा लागल्याने आणि तासन्तास गाडीत बसून राहावे लागल्याने भाविकांचे अन्नपाण्यावाचून प्रचंड हाल झाले.
रेल्वे स्टेशन बंद
पौर्णिमेच्या निमित्ताने महाकुंभमेळ्यात पवित्र स्नानासाठी भाविकांचा ओघ वाढला आहे. १२ फेब्रुवारी रोजी पौर्णिमा असून, ११ फेब्रुवारीपासून रेल्वे स्थानक बंद करणे अपेक्षित होते. पण, प्रयागराजमध्ये येणाऱ्या भाविकांच्या संख्या वाढल्याने १० फेब्रुवारीलाच प्रयागराज संगम रेल्वे स्थानक बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला.