प्रयागराज,दि.29: प्रयागराजच्या महाकुंभ मेळाव्यात (Mahakumbh) काल रात्री एक भीषण दुर्घटना झाली. संगम स्थळावर रात्री 2 वाजण्याच्या सुमारास चेंगराचेंगरी झाली, या अपघातात 30 भाविकांचा मृत्यू झाला, तर 60 जण जखमी झाले. अशी माहिती मेळा प्रशासनाने दिली आहे. हा अपघात कसा झाला हे महाकुंभचे डीआयजी वैभव कृष्णा यांनी सांगितले. ते म्हणाले की, भाविक ब्रह्म मुहूर्ताची वाट पाहत होते, त्यावेळी अचानक काही भाविक दर्शनासाठी आले. मागून आलेल्या जमावामुळे चेंगराचेंगरी झाली. 29 रोजी कोणतेही व्हीव्हीआयपी मुव्हमेंट झाले नसल्याचे त्यांनी सांगितले. आगामी मोठ्या सण किंवा स्नानानिमित्त व्हीव्हीआयपी मुव्हमेंट होणार नाही.
रात्री दोन वाजता दुर्घटना
रात्री 2 वाजण्याच्या सुमारास लाऊडस्पीकरमधून मंत्र आणि श्लोकांच्या गजरात कुंभमेळा परिसरात संगमकडे धावणाऱ्या रुग्णवाहिकांचे आवाज आणि पोलिसांच्या वाहनांचे मोठे सायरन वाजत होते. या दुर्घटनेनंतर आखाड्यांकडून अमृतस्नान पुढे ढकलण्यात आले, मात्र दुपारी परिस्थिती स्थिर झाल्यावर सर्व आखाड्यांनी अमृतस्नान केले. एजन्सीनुसार, संध्याकाळी 5 वाजेपर्यंत सुमारे 6 कोटी भाविकांनी स्नान केले.
जखमींचे नातेवाईक दाखल
प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार, या अपघाताचे एक कारण म्हणजे गर्दी वाढणे. संगमावर प्रत्येकाला पहाटे 3 वाजता पवित्र स्नान करायचे होते. जखमींना मेळावा परिसरात बांधलेल्या सेंट्रल हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. अनेक जखमींचे नातेवाईकही तेथे पोहोचले, तसेच काही वरिष्ठ प्रशासकीय आणि पोलीस अधिकारीही तेथे पोहोचले. सुरक्षा कर्मचारी आणि बचाव कर्मचारी अनेक जखमींना स्ट्रेचरवर घेऊन जाताना दिसले. ब्लँकेट, पिशव्यांसह लोकांचे सामान इकडे तिकडे विखुरले होते.
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सांगितले की, ही घटना पहाटे 1 ते 2 च्या दरम्यान घडली, जेव्हा काही भाविकांनी आखाडा रस्त्यावरील बॅरिकेड्सवरून उडी मारली. लखनौमध्ये एका उच्चस्तरीय बैठकीनंतर त्यांनी सांगितले की, सकाळी 1 ते 2 च्या दरम्यान आखाडा मार्गावर, जिथे आखाड्यांच्या अमृतस्नानाची व्यवस्था करण्यात आली होती, तिथे काही भाविकांनी बॅरिकेड्सवरून उडी मारली आणि ते गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, तेथे त्यांच्यावर उपचार करण्यात आले.