मदुराई,दि.27: Madurai Train Fire: तामीळनाडूमध्ये (Tamil Nadu) मदुराई स्टेशनवर (Madurai Train Fire) यार्डमध्ये एका उभी असलेल्या रेल्वेच्या डब्यात गॅस सिलेंडरचा स्फोट झाला. मदुराई येथील रेल्वेस्थानकाजवळ रेल्वेच्या खासगी डब्यात शनिवारी पहाटे लागलेल्या आगीत 10 प्रवासी मृत्युमुखी पडले. डब्यातून अवैधरीत्या आणल्या गेलेल्या गॅस सिलेंडरच्या स्फोटामुळे ही दुर्घटना घडली, असे रेल्वेकडून सांगण्यात आले. आगीच्या भक्ष्यस्थानी सापडलेला डबा ‘प्रायव्हेट पार्टी कोच’ होता. तीर्थयात्रेसाठी हा डबा बुक करण्यात आला होता.
Madurai Train Fire: गॅस सिलेंडरचा रेल्वे डब्यात स्फोट
दक्षिण रेल्वेने सांगितले की, रेल्वे कर्मचारी, पोलिस, अग्निशमन दल आणि बचाव कर्मचाऱ्यांनी मदत व बचाव कार्य राबवून 10 मृतदेह बाहेर काढले. सहा मृतकांची ओळख पटविण्यात आली आहे. नागरकॉईल येथून हा डबा एका एक्स्प्रेसला जोडून मदुराईपर्यंत आणण्यात आला होता. तेथून तो लखनौला जाणाऱ्या गाडीला जाेडण्यात येणार होता़ तोपर्यंत डबा वेगळा करून उभा करण्यात आला होता. तो डबा एखाद्या गाडीला जोडलेला असता तर आणखी भीषण दुर्घटना घडली असती.
15 लाख रुपयांची भरपाई मिळणार
सहा मृतांची ओळख पटली असून, ते लखनौ, सीतापूर आणि लखीमपूर येथील रहिवासी आहेत. शत्रुदमन सिंह (सीतापूर), मिथिलेश कुमारी (सीतापूर), शांती देवी (लखीमपूर), मनोरमा अग्रवाल (लखनौ), हिमानी बन्सल (लखनौ) आणि परमेश्वर दयाल अशी मृतांची नावे आहेत.
अशी लागली आग
डबा रेल्वे स्थानकावर उभा होता, तेव्हा काही प्रवाशांनी चहा-नाश्त्यासाठी डब्यातून बेकायदा आणलेल्या स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरचा वापर केला. त्यावेळी सिलिंडरचा स्फोट होऊन आग भडकली.
आम्ही झोपेत होतो, तेव्हा आरडाओरडा ऐकू आला. आम्ही उठून पळू लागलो. पण, दरवाजा बंद होता. कोणी तरी कुलूप तोडले आणि आम्ही बाहेर पडलो. डब्यात एवढा धूर झाला होता की, श्वास घेता येत नव्हता.
- अलका प्रजापती, प्रवासी