मुंबई,दि.२६: Bhagat Singh Koshyari On Ajit Pawar: माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी ‘इंडिया टुडे’ला मुलाखत दिली. यावेळी त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबाबत वक्तव्य केले. महाविकास आघाडीचे सरकार असताना वादग्रस्त वक्तव्य आणि निर्णयांमुळे महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची कारकीर्द कायम वादळी ठरली आहे. देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या शपथविधीमुळे भगतसिंह कोश्यारी चर्चेत आले होते. आता भगतसिंह कोश्यारी यांनी अजित पवार यांचं कौतुक केलं आहे. अजित पवार यांना कितीही वेळा उपमुख्यमंत्री होण्यास सांगा, ते तयार असतात, असं मिश्किल विधान भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांनी केलं आहे.
अजित पवार यांना कितीही वेळा… | Bhagat Singh Koshyari On Ajit Pawar
भगतसिंह कोश्यारी यांनी ‘इंडिया टुडे’ला मुलाखत दिली. तेव्हा फडणवीस आणि अजित पवारांच्या पहाटेच्या शपथविधीबद्दल प्रश्न विचारण्यात आला. “अजित पवारांच्या विचारांमध्ये स्पष्टता आहे. आपल्या उत्तराखंडमध्येही एक मोठे नेते आहेत. कितीही वेळा पराभव झाला, तरी ते हार मानत नाहीत. तसेच, अजित पवार आहेत. त्यांना कितीही वेळा उपमुख्यमंत्री होण्यास सांगा, ते कायम तयार असतात,” असं कोश्यारी यांनी म्हटलं.
“मला कधीकधी अजित पवारांची दया येते. ते अतिशय हुशार आहेत. अजित पवारांकडे चांगला जनाधार आहे. संघटनेत त्यांची ताकद आहे. त्यामुळे अनेक आमदार आणि खासदार त्यांच्याबरोबर असतात. प्रत्येकांचं एक व्यक्तिमत्व असतं,” असेही भगतसिंह कोश्यारी म्हणाले.
शरद पवारांचा आदर करतो
“शरद पवार देशातील ज्येष्ठ नेते आहेत. आजही सर्वजण शरद पवारांचा आदर करतात. व्यक्तिश: मी त्यांचा खूप आदर करतो. शरद पवारांना दोन विद्यापीठांची पदवी माझ्या हातून देण्याची संधी मिळाली. शरद पवार माझ्यापेक्षा आठ-दहा महिन्यांनी मोठे आहेत, त्यामुळे त्यांचा आदर करणे स्वाभाविक आहे. ते उत्तम राजकारणी आहेत,” असं कौतुक भगतसिंह कोश्यारी यांनी शरद पवार यांचं केलं.