LPG Price Hike: घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात मोठी वाढ, सर्वसामान्यांना झटका

0

दि.6: LPG Price Hike: सर्वसामान्यांना घरगुती गॅस सिलेंडर दरवाढीचा झटका बसला आहे. आधीच महागाईने बेजार झालेल्या सामान्य नागरिकांना आणखी एक झटका बसणार आहे. घरगुती वापराच्या एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमती कमी होण्याचे नाव घेत नाही आहेत. आता आज पेट्रोलियम कंपन्यांनी एलपीजी गॅसच्या किमतीमध्ये पुन्हा एकदा मोठी वाढ केली आहे. आजपासून घरगुती गॅस सिलेंडरच्या किमतीमध्ये तब्बल ५० रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे एका सिलेंडरसाठी आता मुंबईत १०५२.५० रुपये मोजावे लागणार आहेत. देशातील चार मोठ्या शहरांचा विचार केल्यास दिल्लीमध्ये एका सिलेंडरसाठी 1053 रुपये, कोलकातामध्ये 1079 रुपये, तर चेन्नईमध्ये 1068.50 रुपये मोजावे लागणार आहेत.

एकीकडे घरगुती वापराच्या गॅस सिलेंडरच्या किमतीत घसघशीत वाढ करण्यात आली असली तरी कमर्शियल सिलेंडरच्या किमतीत मात्र कपात करण्यात आली आहे. 1 जुलै रोजी पेट्रोलियम कंपन्यांनी कमर्शियल गॅस सिलेंडरच्या किमतीत 198 रुपयांनी कपात केली होती. त्यानंतर आता घरगुती सिलेंडरचे भावही कमी होतील, अशी अपेक्षा होती. मात्र कंपन्यांनी सामान्य ग्राहकांना झटका देत भाव वाढवले. तर कमर्शियल सिलेंडर मात्र अजून आठ रुपयांनी स्वस्त केला आहे. त्यामुळे आता मुंबईमध्ये कमर्शियल गॅस सिलेंडर हा 1972 रुपयांना मिळेल.

मागील एक वर्षात घरगुती एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरात जवळपास 200 रुपयांची वाढ झाली आहे. दिल्लीत एक वर्षापूर्वी 834.50 रुपयांच्या घरगुती एलपीजी गॅस सिलेंडरचा दर आज 1053 रुपये झाला आहे. याआधी मे महिन्यात घरगुती एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरात चार रुपयांची वाढ झाली आहे. महागाईने आधीच सर्वसामान्यांचे बजेट बिघडले असताना त्यात आता एलपीजी गॅस दरवाढीची भर पडली आहे.

पाच किलोच्या सिलेंडरच्या दरात वाढ

पाच किलोच्या घरगुती सिलेंडर दरातही वाढ करण्यात आली आहे. पाच किलोच्या गॅस सिलेंडर दरात 18 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. तर, 19 किलोच्या व्यावसायिक एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरात 8.50 रुपयांची कपात झाली आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here