LPG Gas Cylinder: LPG ग्राहकांना आता वर्षाला मिळणार एवढेच सिलेंडर

0

दि.29: LPG Gas Cylinder: घरगुती एलपीजी ग्राहकांना (Domestic LPG Consumers) आता सिलेंडरसाठी रेशनिंग प्रक्रियेला सामोरं जावं लागणार आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये घरगुती गॅस सिलेंडरच्या किमती प्रचंड वाढल्याने सर्वसामान्यांचे बजेट बिघडले आहे. त्यातच आता घरगुती गॅस सिलेंडरसाठी कंपन्यांनी कोटा निर्धारित केला आहे. नव्या नियमांनुसार एका कनेक्शनवर वर्षभरात आता केवळ 15 सिलेंडर मिळणार आहेत. घरगुती एलपीजी ग्राहकांना 15 पेक्षा जास्त सिलेंडर दिले जाणार नाहीत. त्यासोबतच एका महिन्याचा कोटाही निश्चित करण्यात आला आहे. कोणताही ग्राहक एका महिन्यात दोनपेक्षा जास्त सिलेंडर घेऊ शकणार नाही.

आत्तापर्यंत घरगुती विनाअनुदानित कनेक्शन (Non Subsidy Connection) असलेल्या ग्राहकांना हवं तेव्हा आणि वर्षभरात लागतील तेवढे सिलेंडर मिळत होते. पण आता नव्या नियमांनुसार, घरगुती एलपीजी ग्राहकांना वर्षभरात ठराविक म्हणजेच, केवळ 15 सिलेंडर मिळणार आहेत. दरम्यान, पेट्रोलियम कंपन्यांकडून हा नियम लागू करण्यामागे एक महत्त्वाचं कारण सांगितलं जात आहे.

घरगुती एलपीजी सिलेंडरवर घालण्यात आलेल्या मर्यादेबाबत वितरकांनी दिलेल्या माहितीनुसार, सिलेंडरसंदर्भातील रेशनिंगसाठीच्या सॉफ्टवेअरमध्ये बदल करण्यात आले आहेत. तसेच, याची तातडीनं अंमलबजावणी करण्यात आली आहे. तसेच, यासंदर्भात अनेक तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. अनुदानित घरगुती गॅसचं रीफिल हे व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या रिफिलहून महाग असल्यानं अनेकदा व्यावसायिक वापरासाठी अनुदानित घरगुती गॅस रीफिलचा वापर केला जातो. यासंदर्भातील अनेक तक्रारी वारंवार समोर येत असल्यानं घरगुती एलपीजी सिंलेडरवर मर्यादा आणण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं सांगितलं जात आहे.

नव्या नियमानुसार ग्राहकांना महिन्याला दोन सिलेंडर मिळू शकतात. तसेच वर्षभरात मिळणाऱ्या सिलेंडरची कमाल संख्या ही 15 पेक्षा अधिक असणार नाही. मात्र वर्षभरात 15 पेक्षा अधिक सिलेंडर घेण्यावर कुठलीही बंदी नाही. पण 15 पेक्षा अधिकचा सिलेंडर घ्यायचा असेल तर त्यासंदर्भातील आवश्यक कागदपत्रे ही दाखवावी लागतील. त्यामध्ये रेशन कार्ड, कुटुंबातील सदस्यांची संख्या यांचं विवरण यासंदर्भातील कागदपत्रे ही सादर करावी लागतील. या कागदपत्रांची छाननी झाल्यानंतर 15 पेक्षा अधिक सिलेंडर मिळू शकतील.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here