नवी दिल्ली,दि.29: देशात व महाराष्ट्रात लोकसभेच्या जागा वाढणार असल्याचे वृत्त आहे. नवीन संसद भवन उद्घाटनानंतर आता देशात लोकसभेच्या जागा वाढणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. 2026 मध्ये देशात सीमांकन होणार आहे, त्यामुळे देशातील लोकसभेच्या सध्याच्या 543 जागा वाढून 1 हजार 210 होणार असल्याचं सांगण्यात येतं आहे.
देशात व महाराष्ट्रात लोकसभेच्या इतक्या जागा वाढणार?
सध्याच्या लोकसंख्येचा विचार करता नव्या सीमांकनानंतर लोकसभा मतदारसंघाची संख्या वाढेल, त्यामुळे सध्या महाराष्ट्रात लोकसभेच्या 48 जागा असून त्यांची संख्या 82 वर पोहोचण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
यापूर्वी राज्यसभेचे उपसभापती हरिवंश सिंह आणि भाजपचे राज्यसभा खासदार सुशील मोदी यांनीही नवीन सीमांकनाबाबत उल्लेख केला आहे. सध्या देशाची लोकसंख्या ही 142 कोटींवर पोहोचल्याचा अंदाज असून 10 लाख लोकसंख्येमागे एक लोकसभेची जागा असा फॉर्म्युला ठरल्यास लोकसंख्येप्रमाणे देशात 1 हजार 210 मतदारसंघ होतील, पण नव्या संसद भवनामध्ये 888 खासदार बसू शकतील एवढीच व्यवस्था आहे, त्यामुळे 888 मतदारसंघ तयार करायचे झाल्यास, 16 लाख लोकसंख्येमाग एक मतदारसंघाचं समीकरण ठेवावं लागेल.
1952 साली देशात पहिलं सीमांकन झालं तेव्हा 494 लोकसभा मतदारसंघ तयार करण्यात आले, त्यानंतर 1963 साली दुसरं सीमांकन करण्यात आलं आणि 522 मतदारसंघ केले गेले. 1971 ला तिसरं सीमांकन झालं त्यात 543 लोकसभा मतदारसंघ झाले. 2022 मध्ये सीमंकनानंतरही जागा वाढल्या नाहीत, यानंतर आता 2026 मध्ये सीमांकन होणार आहे.