Lockdown: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशातील या राज्यात रविवारी लॉकडाऊन

0

तिरुवअनंतपुरम,दि.२१: Lockdown Updates: कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत देशातील अनेक राज्यात रुग्ण संख्येत मोठी वाढ होत आहे. वाढणाऱ्या रुग्ण संख्येच्या पार्श्वभूमीवर केरळमध्ये (Kerala) रविवारी लॉकडाऊन (Lockdown) करण्यात आला आहे. केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन (Kerala Chief Minister Pinarayi Vijayan) यांनी तातडीची उच्चस्तरिय बैठक घेत अत्यंत महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. राज्यात निर्बंध पुन्हा कठोर करण्यात आले असून पुढील दोन रविवार संपूर्ण लॉकडाऊन जाहीर करण्यात आले आहे.

केरळची (Kerala) दैनंदिन रग्णसंख्या गुरुवारी ५० हजारांच्या जवळ पोहचली. केरळमध्ये गुरुवारी विक्रमी रुग्णसंख्येची नोंद झाली. २४ तासांत राज्यात ४६ हजार ३८७ नवीन कोरोना बाधित रुग्णांची भर पडली व ३२ रुग्ण दगावले. त्याचवेळी राज्यातील कोविड पॉझिटिव्हिटी रेट ४०.२१ इतका झाला. ही भीषण स्थिती लक्षात घेत मुख्यमंत्र्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सर्व संबंधित मंत्री व वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेऊन आढावा घेतला.

हेही वाचा e-EPIC Voter Card: e-EPIC मतदार कार्ड असे करा डाउनलोड

या बैठकीत लॉकडाऊनसह इतरही निर्णय घेण्यात आले. केरळमध्ये पुढील दोन रविवार (२३ जानेवारी आणि ३० जानेवारी) संपूर्ण लॉकडाऊन लावण्यावर सर्वांचे एकमत झाले. त्यानुसार या दोन्ही रविवारी केवळ आवश्यक सेवाच सुरू राहणार आहेत. लोकांना अत्यावश्यक कारणाशिवाय बाहेर फिरण्यासही प्रतिबंध करण्यात आला आहे. ज्या नोकरदार महिलेचं मुल दोन वर्षांपेक्षा लहान आहे अशा महिलांना वर्क फ्रॉम होमची मुभा देण्यात यावी, असे निर्देश सरकारी आणि खासगी आस्थापनांना देण्यात आले आहेत. सहव्याधीग्रस्तांनाही ही मुभा देण्यास सांगण्यात आले आहे.

हे राहणार बंद

– केरळमध्ये पुढील दोन रविवार मॉल, थीएटर्स, बाजारपेठा, धार्मिक स्थळे, थीम पार्क, पर्यटन स्थळे बंद राहणार आहेत.

– शाळा, कॉलेज शुक्रवारपासूनच बंद ठेवण्याचे आदेश दिले गेले आहेत. ऑनलाइन वर्ग मात्र सुरू राहणार आहेत.

– कोविड रुग्णसंख्येचा आढावा घेऊन जिल्हा पातळीवर नवे निर्बंध लावण्याचा निर्णय घेण्याची परवानगी सरकारने दिली आहे.

– धार्मिक कार्यक्रमांचे ऑनलाइन आयोजन करता येईल. दोन्ही रविवार सोडून इतर दिवशी थीएटर आणि बार बंद ठेवण्याबाबत निर्णय जिल्हाधिकाऱ्यांनी घ्यायचा आहे.

– तिरुवअनंतपुरम, वायनाड, पलक्कड, इडुक्की आणि पठानमथ्थिटा जिल्ह्यातील स्थिती गंभीर आहे. त्यामुळे तिथे अधिक कठोर निर्बंध लावले जाण्याची शक्यता आहे. एर्नाकुलम, अलाप्पुझा आणि कोल्लम या जिल्ह्यांत ५० जणांच्या उपस्थितीत सार्वजनिक कार्यक्रम घेण्यास अनुमती दिली गेली आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here