कृष्णजन्मभूमी-शाही ईदगाह मशीद वाद, सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय

0

नवी दिल्ली,दि.16: मथुरा कृष्ण जन्मभूमी-शाही ईदगाह मशीद वाद प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने मोठा हस्तक्षेप केला आहे. सध्या शाही इदगाह मशिदीत सर्वेक्षण होणार नाही. अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या कोर्ट कमिशनरच्या नियुक्तीच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. सुप्रीम कोर्टाने सांगितले की, “ट्रायल कोर्टात सुनावणी सुरू राहील, पण कोर्ट कमिशनरच्या नियुक्तीला अंतरिम स्थगिती असेल. सुप्रीम कोर्टात 23 जानेवारीला सुनावणी होणार, आयोगाच्या आदेशाची अंमलबजावणी पुढील सुनावणीपर्यंत होणार नाही.

अलाहाबाद हायकोर्टाने मागच्यावर्षी 14 डिसेंबरला मथुरेच्या श्रीकृष्ण जन्मभूमी मंदिराला लागून असलेल्या शाही ईदगाह परिसरात सर्वेला मंजुरी दिली होती. त्या विरोधात मुस्लिम पक्षकारांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती.

सुप्रीम कोर्टाने हिंदू पक्षकाराला प्रश्न उपस्थित करत म्हटले की, “तुमचा अर्ज अतिशय अस्पष्ट आहे. तुम्हाला काय हवे आहे ते तुम्हाला स्पष्टपणे सांगावे लागेल. याशिवाय या कोर्टात बदलीचे प्रकरणही प्रलंबित आहे. त्यावर देखील आम्हाला निर्णय घ्यायचा आहे.”

मथुरा कृष्णजन्मभूमीशी संबंधित 18 याचिका मथुरा जिल्हा न्यायालयातून उच्च न्यायालयात हस्तांतरित करण्याला स्थगिती देण्याची मागणी करणाऱ्या मुस्लिम बाजूच्या याचिकेवर सुनावणी झाली. त्याचवेळी मुस्लीम पक्षाच्या वतीने ईदगाह कमिटीने कोर्ट कमिशनरच्या नियुक्तीबाबत उच्च न्यायालयाच्या आदेशाला स्थगिती देण्याची मागणीही केली आहे.

गेल्या सुनावणीत सुप्रीम कोर्टाने या प्रकरणी आत्ताच कोणताही आदेश जारी करणार नसल्याचे सांगितले होते. 14 डिसेंबर रोजी मथुरा येथील श्री कृष्ण जन्मभूमी शाही इदगाह मशीद प्रकरणी सर्वेक्षणासाठी कोर्ट कमिशनर नेमण्याच्या अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. मशीद व्यवस्था समितीने या प्रकरणावर लवकर सुनावणीसाठी सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली होती.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here