Kolhapur Update: दूरसंचार कंपन्यांना कोल्हापुरात इंटरनेट सेवा बंद करण्याचे आदेश

0

कोल्हापूर,दि.7: Kolhapur Update: दूरसंचार कंपन्यांना कोल्हापुरात इंटरनेट सेवा बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. शिवराज्याभिषेक दिनी सात तरुणांकडून आक्षेपार्ह स्टेटस लावण्यात आल्यानंतर कोल्हापूरमध्ये (Kolhapur News) काल दुपारपासून उद्भवलेल्या परिस्थितीने आज उग्र रुप धारण केलं आहे. कोल्हापुरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात हिंदुत्ववादी संघटनांनी पुकारलेल्या ठिय्या आंदोलनाला हिंसक वळण लागल्याने पोलिसांना लाठीमार, अश्रूधुराच्या नळकांड्या फोडाव्या लागल्या. पोलिसांनी केलेल्या बळाच्या वापरानंतर रस्त्यावर पळापळ आणि चपलांचा ढीग दिसून आला.

Kolhapur Update: कोल्हापुरात इंटरनेट सेवा बंद करण्याचे आदेश

दरम्यान कोल्हापूरमध्ये सोशल मीडियामधून कुठल्या प्रकारचे आक्षेपार्ह मेसेज व्हायरल होऊ नयेत यासाठी कोल्हापूर पोलिसांकडून आता मोबाईल इंटरनेट सेवा खंडित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. जिल्हाधिकाऱ्यांकडून दूरसंचार कंपन्यांना आदेश देण्यात आल्याची माहिती पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित तसेच कोल्हापूर परिक्षेत्राचे आयजी सुनील फुलारी यांनी दिली आहे. कोल्हापूरचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार आणि पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केलं आहे.

कोल्हापुरात परिस्थिती नियंत्रणात

कोल्हापुरात शिवाजी चौक परिसराला लागून असलेला कोल्हापूर महानगरपालिकेच्या भाग, गंजी गल्ली, महाद्वार रोड, अकबर मोहल्ला तसेच शिवाजी रोड आदी ठिकाणी तोडफोडीच्या घटना समोर आल्या. त्यामुळे परिस्थिती तणावपूर्ण झाली होती. मात्र पोलिसांनी बळाचा आणि संयमाचा उत्कृष्टपणे वापर करत परिस्थिती नियंत्रणात आणली. दुपारी साडेबारापर्यंत पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आली होती. मात्र, त्यानंतर दबा धरुन बसलेले तरुण पुन्हा एकदा रस्त्यावर आल्याने पोलिसांना अश्रूधुराच्या नळकांड्या फोडाव्या लागल्या.

कोल्हापूर परिक्षेत्राचे आयजी रस्त्यावर

दुसरीकडे कोल्हापुरातील तणावाची स्थिती लक्षात घेता राज्याच्या गृह विभागाकडून सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर कोल्हापूर परिक्षेत्राचे आयजी सुनील फुलारी हे स्वतः शिवाजी चौकमध्ये रस्त्यावर उतरले. परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, परिस्थिती नियंत्रणात आहे. जे पोलीस रस्त्यावर होते त्यांनी परिणामकारकपणे कारवाई केली आहे. यासंदर्भात आतापर्यंत सहा जणांना अटक माहिती त्यांनी दिली. त्याचबरोबर जे रस्त्यावर उतरले ते कोण आहेत याची माहिती घेत असल्याचे त्यांनी सांगितले.

कोल्हापूरचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी वादग्रस्त स्टेटस लावणाऱ्यांपैकी सहा जणांना अटक करण्यात आल्याची माहिती एबीपी माझाशी बोलताना दिली. दुसरीकडे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कारवाई करण्याचे आदेश देतानाच कुठल्याही प्रकारचे उदात्तीकरण खपवून घेणार नाही अशी माहिती दिली. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था सुरळीत असल्याचा दावा केला. तसेच संबंधितांना आदेश देण्यात आल्याचे सांगितले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here