KCR In Solapur: ‘होय, इथल्या नेत्यांचं दिवाळं निघेल आणि शेतकऱ्यांची दिवाळी होईल…’ के चंद्रशेखर राव

0

सोलापूर,दि.२७: KCR In Solapur: तेलंगणाचे मुख्यमंत्री आणि BRS चे अध्यक्ष के चंद्रशेखर राव सोलापूर दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात त्यांनी शक्ती प्रदर्शन केले आहे. या दौऱ्याच्या निमित्ताने त्यांनी १००हून जास्त आमदार आणि शेकडो गाड्या आणून मोठ्या प्रमाणावर शक्तीप्रदर्शन करण्याचा प्रयत्न केल्याची टीका महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळातून केली जात आहे.

केसीआर यांनी आज पंढरपुरात विठ्ठल-रुक्मिणीचं दर्शन घेतल्यानंतर सरकोली गावात जाहीर सभा घेतली. या सभेत भगीरथ भालके यांचा बीआरएसमध्ये प्रवेश झाला. यावेळी बोलताना केसीआर यांनी महाराष्ट्रातील राजकीय पक्षांवर खोचक शब्दांत टीका केली.

इथे शेतकऱ्यांना विमा का नाही? | KCR In Solapur

केसीआर यांनी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना एकदा आम्हाला संधी देऊन पहा, इथे शेतकऱ्यांना विमा का नाही, असा सवाल करत भाजपा, राष्ट्रवादी, काँग्रेस, शिवसेना पक्षांवर तोफ डागली. तसेच, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या धोरणावरही टीका केली. डिजिटल इंडिया म्हणतात, पण शेतकऱ्यांसाठी का नाही डिजिटल इंडिया, असा सवाल केसीआर यांनी केला. तसेच, मेक इन इंडियावरुनही टीका केली.  

स्वातंत्र्याची लढाई आज पुन्हा एकदा लढावी लागणार

मी मराठीत बोलू शकत नाही, परंतू मराठी समजू शकतो. स्वातंत्र्याची लढाई आज पुन्हा एकदा लढावी लागणार आहे. नव्या उदयाच्या दिशेने देशाला चालावे लागणार आहे. जगातील अनेक देश आपल्यासमोरच कुठल्याकुठे पोहोचले आहेत. सा. कोरिया, जपान, सिंगापूर, मलेशिया, बाजुला चीन आहे. १९८२ पर्यंत चीन आपल्यापेक्षा गरीब होता. आज कुठे आहे, याचा विचार करावा लागेल. निवडणुका येतात, जातात कोणी ना कोणी जिंकत असतो. आजवर किती पक्षांना आपण पाठिंबा दिला. महाराष्ट्रात एक पक्ष सांगा ज्याला तुम्ही संधी दिली नाही. काँग्रेसला ५० वर्षे, राष्ट्रवादी, शिवसेना, भाजपाला संधी दिलीत. करायचे असते तर यापैकी कोणीतरी केले असते. तेलंगानाच्या छोट्या राज्यात शेतकऱ्यांसाठी सर्वकाही केले जाऊ शकते. भालकेंनी तुम्हाला सर्व योजना सांगितल्या आहेत. जर तेलंगानात या गोष्टी होत असतील तर महाराष्ट्रात का नाही. शेतकऱ्यांना विमा का नाही, असा सवाल केसीआर यांनी विचारला. 

“गेल्या काही दिवसांत एक गोष्ट मला खटकते. आज देशाचं ध्येय काय आहे? काही आहे की विना ध्येयाचेच आपण भटकत आहोत? काय चाललंय या देशात? प्रत्येक भारतीयानं यावर विचार करायला हवा. भारत स्वतंत्र होऊन ७५ वर्षं उलटली. ७५ वर्षं हा काही कमी काळ नाहीये”, असं के चंद्रशेखर राव यावेळी म्हणाले.

…तर महाराष्ट्रात का नाही?

“निवडणुका होत असतात. कुणी ना कुणी जिंकतच असतं. किती पक्षांना आपण पाठिंबा दिला. महाराष्ट्रासारख्या राज्यात मला एक पक्ष सांगा ज्यांना राज्य करण्याची संधी मिळाली नाही. काँग्रेसनं ५० वर्षं राज्य केलं. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, भाजपाला तुम्ही संधी दिली. करायचं असतं, तर यापैकी कुणीतरी एकानं तरी काम केलं असतं. तेलंगणासारख्या नव्या राज्यात शेतकऱ्यांसाठी सर्व योजना राबवल्या जाऊ शकतात तर महाराष्ट्रात का नाही? महाराष्ट्र तर एक मोठं, श्रीमंत राज्य आहे. इथे काय कमी आहे?”, असा प्रश्न केसीआर यांनी उपस्थित केला आहे.

इथल्या नेत्यांचं दिवाळं निघेल आणि शेतकऱ्यांची दिवाळी होईल

“हे सगळे एवढंच सांगतायत की महाराष्ट्रात तेलंगणासारख्या योजना राबवस्या तर महाराष्ट्राचं दिवाळं निघेल. होय, इथल्या नेत्यांचं दिवाळं निघेल आणि शेतकऱ्यांची दिवाळी होईल. आम्ही कुठून आणतोय पैसे? सगळे उलट-सुलट सांगतायत. विचित्र काहीतरी बोललं जातंय”, असं KCR यावेळी म्हणाले.

आम्ही शेतकरी, मागास वर्गाची टीम आहोत

“इथले राजकारणी मला म्हणतायत इथे या, दर्शन घ्या, पण राजकारण करू नका. मला एक कळत नाहीये, आम्ही आत्ता कुठे महाराष्ट्रात सुरूवात केली आहे. पण या सगळ्या पक्षांमध्ये एवढी भीती का आहे? एवढ्या छोट्या पक्षासाठी एवढा गोंधळ का घालताय? कोणताच पक्ष आम्हाला सोडत नाहीये. भाजपा, काँग्रेस बोलतायत. काँग्रेसनं आम्हाला भाजपाची बी टीम म्हटलं. भाजपानं आम्हाला काँग्रेसची ए टीम म्हटलं. या टीम कुठून येतायत? आम्ही शेतकरी, मागास वर्गाची टीम आहोत. बीआरएस हा एकमेव पक्ष आहे ज्यानं घोषणा केली अब की बार, किसान की सरकार. आता या लोकांना भीती वाटत आहे. शेतकरी बीआरएसशी जोडले जातायत म्हणून हे सगळं बोलतायत. बीआरएस ही फक्त तेलंगणा किंवा महाराष्ट्रापर्यंत मर्यादित पार्टी नाही”, अशा शब्दांत केसीआर यांनी राज्यातील सर्वपक्षीयांना टोला लगावला.

भारतात ४१ कोटी एकर शेतीयोग्य जमीन

“भारतात ४१ कोटी एकर शेतीयोग्य जमीन आहे. आपल्याकडे १ लाख ४० हजार टीएमसी पाणी देईल इतका पाऊस पडतो. त्यातल्या निम्म्या पाण्याची वाफ होते. पण निम्मं पाणी आपल्याला वापरायला उपयोगी आहे. त्यामुळे योग्य नियोजन केलं, तर प्रत्येक एकरमध्ये भरपूर पाणी देता येईल”, असंही केसीआर यांनी यावेळी नमूद केलं.

उसाच्या भावासाठी दरवर्षी शेतकऱ्यांना का लढा द्यावा लागतो?

“महाराष्ट्रात उसाच्या भावासाठी दरवर्षी शेतकऱ्यांना का लढा द्यावा लागतो? काय कमी आहे? या समस्येवर एका वर्षात चर्चा करून कायमचा तोडगा काढण्याइतकाही दम या सरकारमध्ये नाहीये का? शेतकऱ्यांचं सरकार आलं, तर हे अगदी सहज होईल. शेतकरी जोपर्यंत एकत्र येत नाहीत, तोपर्यंत हेच चालत राहील”, असंही चंद्रशेखर राव यावेळी आपल्या भाषणात म्हणाले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here