दि.21: कर्नाटकातील (Karnataka) शिवमोगात (Shivamogga) बजरंग दल (Bajrang Dal Activist) कार्यकर्त्याची हत्या. हत्येनंतर कलम 144 लागू करण्यात आलं असून शाळा-कॉलेजं दोन दिवसांसाठी बंद ठेवण्यात आली आहेत. कर्नाटकाच्या शिवमोगात बजरंग दलाच्या कार्यकर्त्याच्या हत्येनंतर तणावाची स्थिती निर्माण झाली आहे. हर्ष असं या बजरंग दलाच्या कार्यकर्त्याचं नाव आहे. हिजाबसंदर्भात सोशल मीडियावर पोस्ट केल्यानं बजरंग दलाच्या या कार्यकर्त्याची हत्या करण्यात आल्याचा आरोप केला जात आहे. या हत्येनंतर शिवमोगा परिसरात तोडफोड आणि वाहनांची जाळपोळ करण्यात आली आहे. ही तणावपूर्ण स्थिती पाहता शिवमोगा परिसरात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. तसेच, परिसरातील शाळाही बंद ठेवण्यात आल्या आहेत.
कर्नाटकात रविवारी रात्री उशिरा बजरंग दलाच्या कार्यकर्त्याची चाकूनं भोसकून हत्या करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. कर्नाटकच्या शिवमोगा जिल्ह्यात काल एका 26 वर्षीय बजरंग दलाच्या कार्यकर्त्याची हत्या झाल्यानंतर तणाव वाढला आहे. ही घटना रात्री 9 वाजता घडली. मिळालेल्या माहितीनुसार, हर्ष असं बजरंग दलाच्या कार्यकर्त्याचं नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्राथमिक तपासात या हत्येचा हिजाब वादाशीही संबंध जोडला जात आहे. तपासादरम्यान असं आढळून आलं आहे की, हर्षनं नुकतीच त्याच्या फेसबुक प्रोफाइलवर हिजाबविरोधात आणि भगव्या शालीच्या समर्थनार्थ एक पोस्ट लिहिली होती.
या घटनेसंदर्भात कर्नाटकचे गृहमंत्री अरागा ज्ञानेंद्र म्हणाले की, “4-5 तरुणांच्या टोळक्यानं 26 वर्षीय तरुणाची हत्या केली. या हत्येमागे कोणती संघटना आहे, हे मला माहीत नाही. सध्या शिवमोगा येथे कायदा आणि सुव्यवस्था नियंत्रणात ठेवण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून शहरांतील सर्व शाळा, महाविद्यालयं दोन दिवस बंद ठेवण्यात आली आहेत.”