मुंबई,दि.30: कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने पाच प्रमुख आश्वासनं दिली होती. लोकसभा निवडणुकीसाठी आता अवघे काही महिने उरले आहेत. वर्ष निवडणुकीचं आहे. काल गॅस सिलेंडरच्या दरात 200 रुपये कपातीच्या दरानं याची चाहूल लागली आहेच. आता आज काँग्रेस (Congress) कर्नाटकात महिलांना दर महिना 2 हजार रुपयांचा भत्ता देणारी योजना लागू करत आहे. 200 विरुद्ध 2 हजारांची ही लढाई निवडणुकीच्या मैदानात कोण जिंकणार हे येत्या काळात कळेलच.
कर्नाटक सरकार देणार महिलांना महिन्याला 2 हजार रुपये
काल गॅस सिलेंडरच्या दरात 200 रुपये कपात झाली आणि ही देशातल्या तमाम महिला वर्गासाठी मोदींकडून रक्षाबंधनाची भेट असल्याचं केंद्रीय मंत्र्यांना जाहीर केलं. आज याच महिलांसाठी काँग्रेस कर्नाटकमध्ये एक भेट जाहीर करत आहे. ही भेट आहे दरमहिना 2000 रुपयांची. त्यामुळे रक्षाबंधनाच्याच मुहूर्तावर 200 विरुद्ध 2000 ची ही लढाई राजकीय पक्षांत सुरु असल्याचं दिसतंय. कर्नाटकमध्ये गृहलक्ष्मी योजनेचा शुभारंभ आज राहुल गांधींच्या उपस्थितीत करण्यात आला. कर्नाटकच्या निवडणुकीत मतदारांना काँग्रेसनं जी पाच प्रमुख आश्वासनं दिली होती. त्यापैकी एक आहे गृहलक्ष्मी योजना.
महिलांना दरमहिना 2 हजार रुपये
प्रत्येक घरातल्या प्रमुख महिलेला दर महिना 2 हजार रुपये दिले जातील
त्यासाठी कर्नाटक सरकारनं वार्षिक 32 हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे
अंत्योदय, बीपीएल आणि एपील ( अबोव्ह पॉव्हर्टी लाईन) रेशन कार्ड धारक महिलांना याचा लाभ मिळणार
प्रत्येक कुटुंबातल्या एकाच महिलेच्या नावावर हे पैसे मिळतील
सरकारी नोकरदार महिला, करदात्या महिला किंवा ज्यांच्या कुटुंबात इनकम टॅक्स, जीएसटी भरला जातो, त्यांना यातून वगळण्यात आलंय
कर्नाटकात 1.1 कोटी महिलांनी आत्तापर्यंत या योजनेसाठी रजिस्ट्रेशन केलं आहे.
काल केंद्र सरकारनं 7 हजार कोटींचा बोजा सहन करत गॅस सिलेंडरच्या दरात 200 रुपयांची कपात केली आहे. आता कर्नाटक सरकारनं केवळ या एकाच वर्षात 17 हजार कोटींची तरतूद या योजनेसाठी बाजूला काढली आहे.
गृहलक्ष्मी योजना
गृहलक्ष्मी ही कर्नाटकमध्ये काँग्रेसच्या पाच प्रमुख आश्वासनांपैकी एक योजना. या पाचपैकी तीन योजना काँग्रेसनं आधीच लागू केल्या आहेत. शक्ती, गृहज्योती आणि अन्नभाग्य या तीन योजना कर्नाटक सरकारनं आधी लागू केल्या आहेत. गृहलक्ष्मीनंतर युवा निधी या योजनेंतर्गत काँग्रेस बेरोजगार युवकांनाही बेरोजगार भत्ता देणार आहेत.