किती दिवस तुरुंगात बसाल, हे तुम्हाला कळणारही नाही, अशी धमकी आताच मिळाली आहे: जितेंद्र आव्हाड

0

मुंबई,दि.१३: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचा मुलगा श्रीकांत शिंदे (Srikant Shinde) यांच्यात शाब्दिक चकमक पाहायला मिळाली. ठाणे आणि कळवा या दोन्ही शहरांना जोडणाऱ्या तिसऱ्या खाडी पुलाचा लोकार्पण सोहळा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडला असून या पुलाच्या श्रेयावरुन वाद सुरू झाला आहे. कळवा येथील पुलानंतर आता मुंब्रा येथील वाय जंक्शन पुलाच्या उद्घाटनावेळीही राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मुलगा श्रीकांत शिंदे यांच्यात शाब्दिक चकमक पाहायला मिळाली. संबंधित पुलाच्या श्रेयवादावरून दोन्ही नेत्यांनी मुख्यमंत्र्यांसमोरच शाब्दिक टोलेबाजी केली आहे.

मुंब्रा येथील पुलाच्या श्रेयवादावरून मुख्यमंत्र्यांसमोर श्रीकांत शिंदे यांच्याशी शाब्दिक चकमक झाल्यानंतर जितेंद्र आव्हाडांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला आहे. यावेळी आव्हाड म्हणाले की, “आमच्यात शाब्दिक युद्ध वगैरे काही झालं नाही. तसेच मला या कामाचं श्रेय घ्यायचं नाही. कामाचं श्रेय घेण्यासाठी जे धावत असतील त्यांना बकबक करावी लागते. कामं कोण करतं? हे इथल्या प्रत्येक माणसाला माहीत आहे. आज ठाणे किंवा इतर कोणत्याही ठिकाणापेक्षा कळवा आणि मुंब्रा हा परिसर विकसित झाला आहे. हे लोकांच्या नजरेत असतं. त्यामुळे मी कुणाशी कशाला वाद-विवाद घालू…” असा टोला आव्हाडांनी लगावला.

श्रीकांत शिंदेंना उद्देशून आव्हाड पुढे म्हणाले की, “आता तो मुख्यमंत्र्यांचा मुलगा आहे. त्याच्याशी बोलताना सांभाळून बोललं पाहिजे. कारण यंत्रणा त्याच्याकडे आहेत. किती दिवस तुरुंगात बसाल, हे तुम्हाला कळणारही नाही, अशी धमकी आताच आम्हाला मिळाली आहे. त्यामुळे त्यांना घाबरलं पाहिजे. सगळ्या मंत्र्यांची चौकशी करू… अशी धमकीही आताच मिळाली आहे. तुम्हाला जामीन कोण देतंय, ते बघू… अशा धमक्या मिळणार असतील तर गाव सोडून गेलेलं बरं…”असंही आव्हाड म्हणाले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here