मुंबई,दि.1: राष्ट्रवादीचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या गाडीवर हल्ला करण्यात आला आहे. जितेंद्र आव्हाड यांनी संभाजीराजे छत्रपती यांच्यासंदर्भात केलेल्या विधानानंतर हा हल्ला करण्यात आला आहे. ठाण्याच्या दिशेने जात असताना गाडीवर हल्ला करण्यात आला आहे. स्वराज्य संघटनेच्या कार्यकर्त्यांनी हा हल्ला केला आहे. या हल्ल्यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकार परिषद घेत भूमिका मांडली. यावेळी जितेंद्र आव्हाड यांनी संभाजीराजे छत्रपती यांच्यावर सडकून टीका केली. ZEE 24 तासने याबाबत वृत्त दिले आहे.
यापुढे आपण संभाजीराजेंना अहो जाओ असा मान देऊन बोलणार नाही, असं जितेंद्र आव्हाड यांनी सुरुवातीला म्हटलं. तसेच “हल्ला करणारे तीन पोरं होती. माझ्या पोलिसांकडे 4 रिव्हॉल्वहर होते, 24 गोळ्या होत्या”, असं वक्तव्य जितेंद्र आव्हाड यांनी केलं. “यापुढे मी तुम्हाला म्हणणार नाही. मी तुला म्हणेन. कारण ही लढाई विचारांची आहे. तुम्ही ज्या विचारांवर जात आहात ते शाहू महाराजांचे विचार नव्हते. हे तुमच्या वडिलांचे सुद्धा विचार नाहीत. एखाद्या मुलाने आपल्या वडिलांचे विचार खोडून टाकावे हे नजीकच्या इतिहासात कधी घडलं नसेल. वडिलांनी तुमचा निषेध करणं हे बेदखल करण्यासारखं आहे”, असा घणाघात जितेंद्र आव्हाड यांनी केला.
काय म्हणाले होते जितेंद्र आव्हाड?
छत्रपती संभाजी महाराज यांच रक्त हिरवा आहे अशा पद्धतीची भूमिका जितेंद्र आव्हाड यांनी काही दिवसापूर्वी मांडली होती. याविरोधात स्वराज्य संघटना आक्रमक झाली आहे. जितेंद्र आव्हाड पोलिसांच्या ताफ्यासह ठाण्याच्या दिशेने जात असताना त्यांच्या गाडीवर बांबूने हल्ला कऱण्यात आला. यावेळी गाडीची काच फोडण्यात आली. विशेष म्हणजे पोलिसांसमोरच हा हल्ला कऱण्यात आला.
संभाजीराजे छत्रपती यांनी विशाळगडावर झालेल्या अतिक्रमणच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली होती. त्यांच्या संघटनेकडून विशाळगाडवर आंदोलनही करण्यात आलं होतं. या आंदोलनानंतर जितेंद्र आव्हाड यांनी संभाजीराजेंवर टीका केली होती.
“संभाजीराजेंना छत्रपती म्हणणं सोडून द्या. कारण त्यांना जो अधिकार होता, त्यांची जी वंशपरंपरा होती, ज्या वंशाचं रक्त ते पुढे घेऊन जात होते त्या रक्तात काय होतं आणि यांच्याकडे काय? हे तपासण्याची गरज आहे. शाहू महाराजांच्या घराण्यातील माणूस असं वक्तव्य करतो ज्यामुळे दंगल होऊ शकते तो शाहू महाराजांचा वारसदार होऊच शकत नाही”, असं वक्तव्य जितेंद्र आव्हाड यांनी केलं होतं.