जितेंद्र आव्हाड अन् अमोल मिटकरींनी उडवली चंद्रकांत पाटलांची खिल्ली

0

दि.१६: राष्ट्रवादीचे नेते मंत्री जितेंद्र आव्हाड अन् आमदार अमोल मिटकरींनी चंद्रकांत पाटलांची खिल्ली उडवली आहे. कोल्हापूर उत्तर विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या जयश्री जाधव विजयी झाल्या आहेत. या निकालाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते. ही निवडणूक महाविकास आघाडी विरुद्ध भाजपा अशी झाली. जाधव यांच्या पत्नी जयश्री यांनी जवळपास १९ हजार मतांनी हे यश मिळवलं असून त्यांना ९६ हजार २२६ मतं मिळाली आहेत. तर भाजपचे उमेदवार सत्यजीत कदम यांना ७७ हजार ४२६ मतं मिळाली आहेत. या निकालानंतर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटील (Chandrakant Patil) यांचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. त्यावरुन, मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) आणि आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी चंद्रकांत पाटील यांची खिल्ली उडवली आहे. 

उत्तर कोल्हापूर मतदारसंघ जिंकण्यासाठी भाजपनं ताकद पणाला लावली होती. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, चित्रा वाघ यांच्यासह बड्या नेत्यांची फौज भाजपनं कामाला लावली होती. मूळचे कोल्हापूरचे असलेले चंद्रकांत पाटील निवडणूक जाहीर झाल्यापासून कोल्हापुरात ठाण मांडून होते. मात्र तरीही भाजपला विजय मिळवता आला नाही. त्यामुळेच, चंद्रकांत पाटील यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यावरुन, जितेंद्र आव्हाड यांनी चंद्रकांत पाटील यांचा फोटो ट्विट केला आहे. त्यामध्ये, ते हिमालयात बसल्याचे दिसून येतात. या फोटोसह आव्हाड यांनी, नको परत या… असे कॅप्शन दिलं आहे. तसेच, हा फुले-शाहू-आंबडेकर विचारांचा विजय असल्याचंही त्यांनी म्हटलं.

 राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनीही ट्विट करत चंद्रकांत पाटील यांच्यावर टिका करत खिल्ली उडवली. ”हनुमान जयंतीच्या पवित्र दिनी कोल्हापूरमधील पराभवानंतर चंद्रकांत दादांना राजकारण सोडून हिमालयात जावे लागणार हे पाहून फार दुःख झाले. दादा तुम्ही अशी वल्गना करायला नको होती, तुमच्यामुळे राजकारणात रोज मनोरंजन होत असे”, असे ट्विट मिटकरी यांनी केलं आहे.

चंद्रकांत पाटील काय म्हणाले होते?

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील कोल्हापूरचे आहेत. मात्र असं असूनही जिल्ह्यात भाजपचा एकही आमदार नाही, अशी चर्चा अनेकदा राजकीय वर्तुळात होत असते. त्यावर बोलताना पाटील यांनी थेट आव्हान दिलं होतं. ‘आज चॅलेंज आहे आपलं. ज्याला वाटतं असेल त्यानं कोल्हापूर जिल्ह्यातल्या विधानसभेच्या कोणत्याही मतदारसंघाचा राजीनामा द्यायचा. पोटनिवडणूक लावायची.. निवडून नाही आलो ना तर सरळ राजकारण सोडून हिमालयात निघून जाईन, असं पाटील म्हणाले होते. सध्या हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. 


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here