“शरद पवार यांच्या सभा होत असताना त्याविषयी काही लोक गैरसमज…” जयंत पाटील

0

कोल्हापूर,दि.२२: शरद पवार यांच्या सभा होत असताना त्याविषयी काही लोक गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न करत आहेत. असे जयंत पाटील यांनी म्हटले आहे. अजित पवार आणि मी आमच्यात कधीही वाद नव्हते. आम्ही शरद पवार यांचे कार्यकर्ते आहोत त्यांच्याबरोबर राहिलो आहोत. इतकंच आहे असं आता जयंत पाटील यांनी म्हटलं आहे. जयंत पाटील यांना प्रश्न विचारण्यात आला की तुमच्यात आणि अजित पवार यांच्यात वाद आहेत का? त्यावर आमच्यात कधीच वाद नव्हते तुम्हाला ते कुठेतरी दिसले का? उगाच कुठलाही मुलामा देऊ नका असं म्हणत जयंत पाटील यांनी हसून या प्रश्नावर उत्तर दिलं आहे. कोल्हापुरात पत्रकारांशी संवाद साधत असताना त्यांनी हे वक्तव्य केलं.

कोल्हापुरात सभा

२५ ऑगस्टला शरद पवार कोल्हापुरात येणार आहेत. दसरा चौकात ते भाषण करणार आहेत. दसरा चौकाला ऐतिहासिक महत्त्व आहे. शरद पवार यांच्या सभेला मोठ्या प्रमाणावर लोक येतील असा विश्वास आम्हाला सगळ्यांनाच आहे. तरुण कार्यकर्ते, महिला आणि जनता या सभेला येईल असा मला विश्वास आहे असंही जयंत पाटील यांनी म्हटलं आहे.

काही लोक गैरसमज पसरवत आहेत

महाराष्ट्रात शरद पवार यांच्या सभा होत असताना त्याविषयी काही लोक गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न करत आहेत. बीडची सभा ही संदीप क्षीरसागर यांनी बोलावलेली सभा होती. ते ओबीसी नेतेच आहेत. त्या ठिकाणी जी भाषणं झाली तेव्हा जितेंद्र आव्हाड यांनीही स्पष्टीकरण दिलं. आम्ही महाराष्ट्रात सगळ्या ठिकाणी जाऊन सभा घेणार आहोत. बीडच्या आधी शरद पवार यांची येवला या ठिकाणी सभा झाली. येवल्याच्या कार्यकर्त्यांनी ती सभा बोलावली होती. तसंच कोल्हापुरातल्या कार्यकर्त्यांनी दसरा चौकात शरद पवार यांनी सभा घेतली पाहिजे असा आग्रह केला त्यामुळे आम्ही २५ तारखेला या ठिकाणी सभा घेणार आहोत. महाराष्ट्रात जात असताना काही लोक गैरसमज पसरवत आहेत. ५ सप्टेंबरला जळगावलाही सभा घेतली जाणार आहे. त्यामुळे ओबीसी नेत्यांबाबत चर्चा घडवून शरद पवार यांच्या नेतृत्वाविषयी काही गैरसमज पसवरले जात असतील तर ते चुकीचं आहे असंही जयंत पाटील यांनी म्हटलं.

शरद पवारांना जे सोडून गेले आहेत, ते सगळेच शरद पवारांना मानतात आणि सांगतात की तेच आमचे नेते आहेत, तेच आमचे विठ्ठल आहेत. आता असे नेते जेव्हा सोडून जातात तेव्हा काय बोलणार? पण या सगळ्यांना राजकारणात पुढे आणण्याचं काम कुणी केलं? तर ते शरद पवारांनी केलं. शरद पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नसता तर आमच्यापैकी कुणीही मंत्रिपदापर्यंतही पोहचलं नसतं. प्रत्येकाची भूमिका असते असंही जयंत पाटील यांनी म्हटलं आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here