जयंत पाटील यांनी सांगितले अजित पवार आणि शरद पवार यांच्यात काय चर्चा झाली

0

मुंबई,दि.१७: उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज (दि.१७) पुन्हा शरद पवार यांची भेट घेतली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात दोन गट पडल्यानंतर अजित पवार यांनी काल (रविवार, १६ जुलै) काही मंत्र्यांसह पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली होती. आज अजित पवार इतर अनेक आमदारांसह पुन्हा एकदा शरद पवार यांना भेटले. यावेळी प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे यांच्यासह राष्ट्रवादीच्या अजित पवार गटातील अनेक महत्त्वाचे नेते आणि आमदार उपस्थित होते. या भेटीत अजित पवार आणि प्रफुल्ल पटेल यांनी शरद पवार यांच्याशी काय चर्चा केली. यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (शरद पवार गट) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी उत्तर दिलं आहे.

अजित पवार आणि शरद पवार यांच्यात काय चर्चा झाली

जयंत पाटील म्हणाले, ती सगळी मंडळी शरद पवार यांना भेटली. त्यांनी शरद पवार यांचे आशीर्वाद घेतले. शरद पवार यांना भेटून काल नऊ मंत्र्यांनी जी विनंती केली होती त्याच विनंतीचा आज पुन्हा एकदा त्यांनी पुनरुच्चार केला. शरद पवार यांनी त्यांची विनंती ऐकून घेतली. मला इथं नमूद करायचं आहे की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा विरोधात आहे. आमचे सर्व आमदार आज अधिवेशनावेळी विरोधी पक्षांबरोबरच बसले होते. तिथेच त्यांची व्यवस्था करण्यास सांगितलं आहे.

जयंत पाटील म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विधानसभेतील नऊ सदस्यांनी सरकारमध्ये शपथ घेतली आहे. तुम्ही आजची अधिवेशनातली व्यवस्था पाहा, राष्ट्रवादी काँग्रेसचे सदस्य विखुरले होते. काही जण विरोधी पक्षांच्या बाजूला बसलो होते, तर काहीजण सत्ताधाऱ्यांच्या बाजूला बसले होते.

यावेळी पाटील यांना विचारण्यात आलं की, शरद पवारांच्या भूमिकेवर सातत्याने प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जातंय, त्यावर तुम्ही काय सांगाल? यावर जंयत पाटील म्हणाले, कोणीही शरद पवार यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्याचं कारण नाही. त्यांनी त्यांची भूमिका याआधी स्पष्ट केली आहे. तसेच येवल्यातल्या सभेतही त्यांनी त्यांची भूमिका मांडली होती. त्यामुळे रोज त्यांना कोणीतरी भेटल्यावर त्यांनी आपली भूमिका नव्याने स्पष्ट करण्याची आवश्यकता नाही.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here