मुंबई,दि.17: राष्ट्रवादीचे (शरद पवार गट) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अजित पवार गटाचे मंत्री छगन भुजबळ यांच्याबाबत मोठं विधान केलं आहे. छगन भुजबळांना निवडणुकीचा कल कोणत्या बाजूने येणार याचा नेहमी अंदाज असतो. भुजबळ हे नाराज आहेत हे ऐकून आहे. अजित पवार नाराज आहेत की आजारी आहेत हे पण माहित नाही. माझा या कोणाशीच संपर्क नाही, असे जयंत पाटील यांनी स्पष्ट केले.
बाळासाहेब ठाकरे यांचा ब्रँड…
4 जूनला जेव्हा निकाल येईल त्यावेळी निकाल बघून काय निर्णय घ्यायचा यासाठी भाजपाने बनविलेला गट प्रयत्न करेल. निकाल बघून पळापळ होणारच असल्याचे संकेत पाटील यांनी दिले. बाळासाहेब ठाकरे यांचा ब्रँड उद्धव ठाकरेच आहेत. राज ठाकरेंचा वेगवेगळा वापर होतो, त्यामुळे त्यांच्यावर बोलणे योग्य नाही, असेही पाटील म्हणाले.
भारतीय जनता पक्षाला दोन पक्ष फोडून देखील जनाधार मिळत नाही ही वस्तूस्थिती आहे. जेवढे पक्ष घेताय तेवढा जनाधार कमी होणार आहे, अशी टीकाही पाटील यांनी केली.
उत्तर मिळाले जय श्रीराम
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेत कांदा प्रश्नी घोषणाबाजी करणाऱ्या किरण सानपला पोलिसांनी ताब्यात घेतल्यावरून जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. कांद्याचा प्रश्न तीन-चार जिल्ह्यात फार महत्त्वाचा आहे. त्याने तो प्रश्न मांडण्याचा प्रयत्न केला. त्याला उत्तर मिळाले जय श्रीराम. त्यामुळे महाराष्ट्राला कळाले की शेतकऱ्यांकडे बघण्याची यांची प्रवृत्ती काय आहे, अशी टीका पाटील यांनी केली.