पोलीस ठाण्यातच भाजपच्या माजी नगरसेवकाला मारहाण; दोन गट भिडले

0

जळगाव: शहरातील शनीपेठ पोलीस ठाण्यातच दोन गटात जोरदार हाणामारी झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे. या राड्यामध्ये भाजपचे माजी नगरसेवक कैलास सोनवणे यांच्यासह त्यांच्या दोन समर्थकांना मारहाण करण्यात आली असून, पोलीस ठाण्याच्या आवारातच झालेल्या या प्रकारामुळे शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

नेमकी घटना काय?

वाल्मिक नगर परिसरात कैलास सोनवणे यांचे कार्यकर्ते आणि तरुणांच्या एका गटात वाद झाला होता. या वादाची तक्रार देण्यासाठी सोनवणे आपल्या समर्थकांसह शनीपेठ पोलीस ठाण्यात पोहोचले होते. मात्र, ते पोलीस ठाण्यात असतानाच दुसऱ्या गटाने तिथे घुसून सोनवणे आणि त्यांच्या साथीदारांवर हल्ला चढवला.

दोन्ही बाजूंनी एकमेकांना भिडल्याने पोलीस ठाण्यात मोठा गोंधळ उडाला. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे पाहून पोलिसांनी हस्तक्षेप करत दोन्ही गटांना पांगवले आणि खबरदारीचा उपाय म्हणून माजी नगरसेवक सोनवणे यांना पोलीस वाहनातून सुरक्षितस्थळी हलवले.

वादाचे कारण: मनपा निवडणुका आणि टेंडर

पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी दिलेल्या माहितीनुसार, या वादाला महापालिका निवडणुकीची किनार आहे. महानगरपालिकेतील टेंडर मिळवण्यावरून झालेल्या वादातून ही हाणामारी झाल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.

पोलिसांची कारवाई आणि बंदोबस्त

दहा जण ताब्यात: पोलिसांनी दोन्ही गटांतील १० जणांना ताब्यात घेतले असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

तगडा बंदोबस्त: घटनेनंतर शनीपेठ पोलीस ठाणे आणि परिसरात राज्य राखीव पोलीस दलाचा (SRPF) मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट: पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी स्वतः पोलीस ठाण्याला भेट देऊन घटनेची पाहणी केली असून शांतता राखण्याचे आवाहन केले आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here