सहा महिन्यांपूर्वीच ठरलं होत ! ४० वर्षाचा संघर्ष संपुष्टात, मैत्रीचे पर्व सुरू 

0

सोलापूर,दि.२०: आपलं आणि मोहिते पाटील यांच सहा महिन्यांपूर्वीच ठरलं होतं असा गौप्यस्फोट करून लोकसभा निवडणुकीत आपण व आपले कार्यकर्ते धैर्यशील मोहिते पाटील यांचे काम करणार असून त्यांना आमचा पाठिंबा आहे अशी घोषणा धनगर समाजाचे ज्येष्ठ नेते उत्तमराव जानकर यांनी केली. शुक्रवारी (दि.१९) वेळापूर येथे जानकर समर्थकांची बैठक बोलावण्यात आली होती.

शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, ज्येष्ठ नेते जयसिंह मोहिते पाटील, उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील, विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजीत पाटील, माजी सभापती मच्छिंद्र ठवरे, नामदेव वाघमारे, भानुदास सालगुडे पाटील, माणिक वाघमोडे, मारुती पाटील, गौतम माने, दादाराजे घाडगे, आरिफ पठाण, तुकाराम देशमुख, स्वप्नील वाघमारे, कविराज जाधव, विकास धाईंजे, पांडुरंग वाघमोडे, आप्पासाहेब देशमुख, माऊली पाटील, राजू जानकर, शेखर माने, दत्ता मगर, अनिल सावंत, डॉ तुकाराम ठवरे, दुर्योधन पाटील, सोमनाथ पिसे, तुषार पाटील, धनजय साठे, बाबा माने, अमोल पनासे आदी यावेळी उपस्थित होते.

प्रारंभी तालुक्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. भाजपने  गेल्या अनेक वर्षांपासून उत्तमराव जानकर व त्यांच्या सहकाऱ्यांची फसवणूक केली आहे. त्यामुळे भाजपला तालुक्यातून हद्दपार करावे अशी मागणी यावेळी करण्यात आली. त्यानंतर उपस्थित सर्वच कार्यकर्त्यांनी ही मागणी उचलून धरली . पदाधिकाऱ्यांच्या भावना ऐकून घेतल्यानंतर बोलताना जानकर म्हणाले, मी  अजित पवार गटात असून माझा राग भाजपवर आहे. २०१९ ला आम्ही दोघेही फसलो होतो. दोघांनीही तिकीट मागायचे असा प्लॅन होता.

पण त्यावेळी ते झाले नाही आता धैर्यशील मोहिते पाटील यांना मीच उभा केले आहे  आता त्यांच्यावरती ३०२ चा गुन्हा दाखल करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. गुन्हा दाखल झाला तरी मोहिते पाटील यांच्यासाठी जीवाचं रान करून त्यांना निवडून आणेन. तीन लाखांचं मताधिक्य देऊ असे सांगून निकालानंतर त्यांची जंगी मिरवणूक काढू असे  जानकर यांनी सांगितले.

सगळे मिळून करेक्ट कार्यक्रम करू 

माळशिरस तालुक्यात यापुढे विकासाचे राजकारण करूया. विरोधकांचा करेक्ट कार्यक्रम सगळे मिळून करून बीडचे पार्सल परत पाठवू असे  राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांनी सांगितले.

वैर आजपासून संपले

आपलं ठरलंय, मी शब्द बदलणारा माणूस नाही असे सांगून जयसिंह मोहिते पाटील म्हणाले,जानकर आणि आपल्यातील वैर आजपासून संपले आहे या पुढील काळात आम्ही मिळून काम करणार आहोत. विकासासाठी एकत्र येण्याची भूमिका आम्ही घेतली असल्याचे त्यांनी सांगितले.

स्वाभिमानाने घेतलेला निर्णय कौतुकास्पद

उत्तमराव जानकर यांनी स्वाभिमान आणि घेतलेला हा निर्णय कौतुकास्पद आहे. त्यांना विविध प्रकारचे अमिष दाखवले मात्र या आमिषाला ते बळी पडले नाहीत. लोकसभा निवडणुकीत त्यांनी आपल्याला मदत करण्याची भूमिका घेतली. येणारी विधानसभा निर्णय कौतुकास्पद आहे मी महाराष्ट्रात स्वाभिमानाने राहतो दिल्ली समोर झुकत नाही हा निर्णय घेऊन अकलूजकरांनी व वेळापूरकरांनी राज्याला संदेश दिला आहे. 


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here