मुंबई,दि.१०: महाराष्ट्रात शिवसेनेने काँग्रेस, राष्ट्रवादी सोबत राज्यात सरकार स्थापन केले. आघाडीचे सरकार आल्यापासून खासदार संजय राऊत (Sanjay Raut हे काँग्रेस व राष्ट्रवादीची स्तुती करताना दिसतात. भाजपाचे नेते संजय राऊत यांच्यावर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत. त्यातच संजय राऊत हे महाविकास आघाडीच्या बाजूनं सातत्यानं किल्ला लढवत असल्यानं ते नेहमीच रडारवर असतात. आता काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांचं कौतुक केल्यानं भाजपचे विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी राऊतांवर बोचऱ्या शब्दांत टीका केली आहे.
संजय राऊत यांनी शिवसेनेचं मुखपत्र ‘सामना’मध्ये आज लिहिलेल्या लेखात प्रियंका गांधी यांचं तोंडभरून कौतुक केलं आहे. लखीमपूर खेरी इथं मंत्रीपुत्रानं शेतकऱ्यांना चिरडल्याच्या घटनेनंतर प्रियंका आक्रमक झाल्या होत्या. पीडित कुटुंबीयांची भेट घेण्याचा आग्रह त्यांनी धरला होता. त्यांना अटक करण्यात आली. मात्र, तरीही त्या मागे हटल्या नाहीत. त्यांच्या या संघर्षाचं संजय राऊत यांनी आपल्या लेखात कौतुक केलं आहे. प्रियंका यांची तुलना इंदिरा गांधी यांच्याशी केली आहे.
प्रियंकांविषयी नेमकं काय म्हटलंय संजय राऊत यांनी?
‘प्रियंका गांधींच्या अटकेनं व संघर्षानं देश खडबडून जागा झाला. ४ ऑक्टोबरच्या पहाटेचा प्रियंका गांधींचा संघर्ष ज्यांनी पाहिला, त्यांना इंदिरा गांधींचं अस्तित्व देशात आहे व ते अस्तित्व जोपर्यंत आहे तोपर्यंत लोकशाही जिवंत राहील याची खात्री पटली असेल. चार खून पचवून सुखानं झोपलेल्या जगातल्या सर्वात मोठ्या पक्षाची झोप उडवण्याचं काम प्रियंकांनी केलं आहे,’ असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
पडळकर यांनी याच लेखाचा फोटो सोशल मीडियावर शेअर करत संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे. राऊत यांचा उल्लेख पडळकर यांनी ‘जनाब’ असा केला आहे. ‘जनाब संजय राऊत यांनी सामनाचे रूपांतर ‘बाबरनामा’त केल्यानंतर आता हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेल्या शिवसेनेचं विलीनीकरण काँग्रेसमध्ये करण्याचा जणू काही विडाच उचललेला दिसतोय,’ असं पडळकर यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.
जनाब #संजय राऊत यांनी #सामनाचे रूपांतर बाबरनामात केल्यानंतर आता हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब #ठाकरे यांनी स्थापन केलेल्या शिवसेनेचे विलीनीकरण #कॉंग्रेसमध्ये करण्याचा जणू काही विडाच उचललेला दिसतोय.#BJPMaharashtra pic.twitter.com/i9jQI46gRy
— Gopichand Padalkar (@GopichandP_MLC) October 10, 2021