नवी दिल्ली,दि.8: विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी 10 जानेवारीला शिवसेना आमदार अपात्र प्रकरणी निकाल दिला. नार्वेकर यांनी एकनाथ शिंदे यांचाच शिवसेना पक्ष असल्याचा निकाल दिला होता. ठाकरे गटाने या निकालाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. यावर काल सर्वोच्च न्यायालयाने महत्वाचे निरीक्षण नोंदवले.
शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचा निकाल आमच्याच न्यायालयाने दिलेल्या निकालाशी विसंगत नाही का, असा सवाल आज सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी उपस्थित केला. या प्रकरणाची सुनावणी मुंबई उच्च न्यायालयात व्हावी की सर्वोच्च न्यायालयात, हा मुद्दा खुला ठेवताना, सर्वोच्च न्यायालयाने पुढील सुनावणी 8 एप्रिलला निश्चित केली. तसेच राहुल नार्वेकर यांच्यापुढे सादर करण्यात आलेले मूळ दस्तावेज मागवून घेतले आहे.
राज्यातील सत्तासंघर्षासंबंधी सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या याचिकेसंदर्भात सुनावणी सुरू आहे. सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी दिलेल्या निकालाची मूळ कागदपत्रं मागवली आहेत. या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी घ्यायची की उच्च न्यायालयात घ्यायची यावर 8 एप्रिलला निर्णय घेण्यात येणार आहे.
उद्धव ठाकरे यांनी शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी काल पूर्ण झाली. उद्धव ठाकरे यांच्या वतीने कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद केला तर एकनाथ शिंदे गटाच्या वतीने हरीश साळवेंनी युक्तिवाद केला.
आमच्या निकालपत्रात जे लिहिलेलं आहे त्याविरोधात निर्णय झालाय का? असा सवाल सरन्यायाधीशांनी शिंदे गटाचे वकील हरिश साळवी यांना विचारला. खरा पक्ष कोणता पक्ष आहे हे विधानसभेतील बहुमतावरून ओळखता येते, हे आमच्या निकालाच्या विरोधात नाही का? असा प्रश्नही कोर्टाने विचारला.
मूळ पक्ष कोणता हे ठरविताना विधीमंडळातील बहुमताची तुलना पक्ष संघटनेतील बहुमताशी करता येणार नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केल्याचे ठाकरे गटाने निदर्शनास आणले. पक्षात फूट पडल्यानंतर खऱ्या पक्ष विधीमंडळ पक्षाची ओळख बहुमतातून ठरते, असे नार्वेकरांनी म्हटले होते. त्यावर न्या. चंद्रचूड यांनी प्रश्नचिन्ह लावले.