मुंबई,दि.११: इराण आणि इस्रायलमधील संघर्ष आता टोकाला पोहोचला असून, इराणने दिलेल्या इशाऱ्यानुसार होर्मुझच्या सामुद्रधुनीत (Strait of Hormuz) कारवाई सुरू केली आहे. बुधवारी इराणच्या प्रभावाखालील या सागरी क्षेत्रात ‘मयुरी नारी’ या थायलंडच्या मालवाहू जहाजाला लक्ष्य करण्यात आले. विशेष म्हणजे, हे जहाज भारताच्या गुजरात (कांडला) बंदराकडे येत होते.
नेमकी घटना काय?
थायलंडच्या ‘प्रेशियस शिपिंग पीसीएल’ कंपनीचे मयुरी नारी हे जहाज संयुक्त अरब अमिरातीतील (UAE) खलिफा बंदरातून निघाले होते. हे जहाज गुजरातमधील कांडला बंदराच्या दिशेने येत असताना होर्मुझच्या सामुद्रधुनीत त्यावर हल्ला झाला. रॉयल थायलंड नेव्हीने प्रसिद्ध केलेल्या फोटोंमध्ये जहाजातून काळा धूर निघताना आणि समुद्रात ‘लाईफ राफ्ट्स’ तरंगताना दिसत आहेत, ज्यावरून हल्ल्याची तीव्रता स्पष्ट होते.
हल्ल्याचे महत्त्वाचे तपशील:
• जहाज: मयुरी नारी (लांबी १७८ मीटर, वजन ३०,००० टन).
• कर्मचारी: जहाजावर एकूण २० क्रू मेंबर्स होते, त्यापैकी १७ जणांना वाचवण्यात यश आले असून ३ जण अद्याप बेपत्ता आहेत.
• हल्ल्याचे स्वरूप: एका अज्ञात प्रक्षेपणाने जहाजाच्या ‘हल’ आणि ‘सुपरस्ट्रक्चर’ला लक्ष्य केले.
• सद्यस्थिती: रॉयल थायलंड नेव्ही आणि युनायटेड किंग्डम मेरीटाईम ट्रेड ऑपरेशन्स (UKMTO) या घटनेचा कसून तपास करत आहेत. अद्याप कोणत्याही गटाने या हल्ल्याची अधिकृत जबाबदारी स्वीकारलेली नाही.
होर्मुझची सामुद्रधुनी का आहे चर्चेत?
होर्मुझची सामुद्रधुनी हा जगातील सर्वात महत्त्वाचा ऊर्जा पुरवठा मार्ग मानला जातो. मात्र, इराणने या भागावर आपले वर्चस्व वाढवले असून, अलीकडेच अमेरिका आणि इस्रायलसोबत झालेल्या वादानंतर या मार्गावरील सुरक्षा धोक्यात आली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून अनेक कंपन्यांनी हा मार्ग टाळला असतानाही, काही जहाजांची वाहतूक सुरू होती, ज्यावर आता हल्ला झाला आहे.








