नवी दिल्ली,दि.22: Indian Army News: पाकव्याप्त काश्मीरबाबत (Pakistan Occupied Kashmir) भारतीय लष्कर मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर आली आहे. पाकव्याप्त काश्मीर परत घेण्यासाठी भारत सज्ज असल्याचं लष्करानं म्हटलं आहे. लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी याबाबत एक वक्तव्य केलंय. त्यामुळे पाकव्याप्त काश्मीर परत घेण्यासाठी भारताकडून हालचाली सुरू असल्याची चर्चा आहे. गेल्या अनेक वर्षांपासून पाकव्याप्त काश्मीरचा मुद्दा प्रलंबित असून भारत आणि पाकिस्तान सीमेदरम्यान यामुळे सतत तणावाचं वातावरण असतं. (Indian Army News Marathi)
भारतीय लष्कराचे उपेद्र द्विवेदी यांनी यासंबंधी एक वक्तव्य केलं आहे. ते म्हणाले की, पाकव्याप्त काश्मीरवर कारवाई करण्यासाठी भारतीय लष्कर पूर्णपणे तयार आहे. भारत सरकारने आम्हाला जर आदेश दिला तर कोणत्याही कारवाईसाठी भारतीय लष्कर सज्ज आहे. (Indian Army News Marathi)
पाकव्याप्त काश्मीर
भारताचा सर्वात उत्तरेकडील भाग म्हणजे गिलगिट बाल्टिस्तान होय. स्वातंत्र्यानंतर याच प्रदेशावर पाकिस्तानी लष्कर आणि घुसखोरांनी ताबा मिळवला आणि तेव्हापासून हा भाग पाकिस्तानकडे आहे. या प्रदेशावर भारताकडून दावा केला जात आहे, तसाच पाकिस्तानकडूनदेखील या प्रदेशावर दावा केला जात आहे.
संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांचेही संकेत
भारतीय वायूदलाच्या वतीने 27 ऑक्टोबर रोजी शौर्यदिनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्याममध्ये बोलताना संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी पाकव्याप्त काश्मीर भारतात परत आणण्यासाठी भारताकडून कारवाई करण्यात येणार असल्याचे संकेत दिले होते. ते म्हणाले होते की, “पाकव्याप्त काश्मीरमध्ये पाकिस्तानी लष्कराकडून लोकांवर मोठ्या प्रमाणावर अत्याचार होत आहे. त्याचा परिणाम पाकिस्तानला भोगावाच लागेल. गिलगिट आणि बाल्टिस्तान हे प्रदेश पाकिस्तानकडून भारतामध्ये परत आणल्यानंतरच भारताचं मिशन पूर्ण होणार.”
पाकव्याप्त काश्मीर भारताचा अविभाज्य भाग
जम्मू काश्मीरचा उत्तरेकडील भाग असलेला गिलगिट बाल्टिस्तान हा भाग सध्या पाकिस्तानच्या नियंत्रणाखाली आहे. भारत-पाकिस्तानची फाळणी झाल्यानंतर हा भाग भारतात सामील झाला होता. पण पाकिस्तानने या भागात घुसखोर आणि लष्कर घुसवले आणि गिलगिट बाल्टिस्तानचा भाग बळकावला. यावेळी पाकिस्तानचे लष्कर श्रीनगरपर्यंत पोहोचलं होतं. पण भारतीय लष्कराने त्यांना मागे सारलं. त्यानंतर संयुक्त राष्ट्रांने या ठिकाणी युद्धबंदीची घोषणा केली. त्यामुळे या ठिकाणची परिस्थिती जैसे थे ठेवण्यात आली. तेव्हापासून पाकिस्तानने या भागावर आपला दावा सांगितला आहे.
पाकव्याप्त काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग असून तो एक दिवस भारत परत मिळवणारच असा विश्वास भारताकडून व्यक्त केला जातोय.