मुंबई,दि.24: India Today C Voter Survey: 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी सर्व पक्षांनी तयारी पूर्ण केली आहे. 2019 च्या विधानसभा निवडणुकीचे निकाल लागल्यापासून राज्यात सुरू असलेल्या राजकीय उलथापालथीमध्ये ठरावीक अंतराने नवनवे अंक समोर येत आहेत. मुख्यमंत्रिपदावर दावेदारी करत उद्धव ठाकरे यांनी सुरुवातीला अडीच वर्षे महाविकास आघाडीचं सरकार चालवल्यानंतर एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली झालेल्या बंडाचा फायदा घेत भाजपाने पुन्हा एकदा राज्यात आपली सत्ता आणली होती.
त्यानंतर वर्षभरातच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पाडत अजित पवार यांनाही भाजपाने युती सरकारमध्ये सामावून घेतले होते. दरम्यान, या फोडाफोडीच्या राजकारणामुळे भाजपावर चौफेर टीका होत असते. मात्र आज जर लोकसभेची निवडणूक झाली तर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेल्या फुटीचा भाजपाला फायदा होईल का, असा प्रश्न विचारला असता सर्व्हेमधून धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे.
सर्वेतून धक्कादायक आकडेवारी आली समोर | India Today C Voter Survey
इंडिया टुडे आणि सी वोटर यांनी देशाचा कल जाणून घेण्यासाठी केलेल्या एका व्यापक सर्वेमध्ये विरोधी पक्षांमध्ये पडलेल्या फुटीमुळे महाराष्ट्रात भाजपाला फायदा होईल का? असा प्रश्न विचारण्यात आला होता. या प्रश्नाचं उत्तर देताना तब्बल 60 टक्के लोकांनी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीमुळे भाजपाला फायदा होईल, असं म्हटलं आहे. तर 25 टक्के लोकांनी या फुटीचा भाजपाला काहीही फायदा होणार नाही, असं म्हटलं आहे. तर 15 टक्के लोकांनी काही सांगता येणार नाही, असं मत मांडलं आहे.
तपास यंत्रणांचा गैरवापर होतोय का?
याच सर्वेमध्ये भाजपाकडून केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर होतोय का? असा प्रश्न विचारण्यात आला असता तब्बल 45 टक्के लोकांनी होय असं उत्तर दिलं आहे. तर 38 टक्के लोकांनी तसा दुरुपयो हा सर्वच पक्ष करतात, असं उत्तर दिलं आहे.
इंडिया टुडे आणि सी वोटरने हा सर्वे 15 जुलै ते 14 ऑगस्टदरम्यान देशभरातील सर्व लोकसभा मतदारसंघांमध्ये केला आहे. त्यामध्ये एकूण 25 हजार 951 जणांचा कल जाणून घेण्यात आला आहे.
एनडीए सरकारचे सर्वात मोठे यश कोणते?
या सर्वेक्षणादरम्यान, जनतेला एनडीए सरकारच्या सर्वात मोठ्या यशाबद्दल विचारण्यात आले. 21 टक्के लोकांनी कोविड-19 चे उत्तम व्यवस्थापन असल्याचे सांगितले. 13 टक्के लोकांनी भ्रष्टाचारमुक्त सरकार चालवत असल्याचे सांगितले. 12 टक्के लोक कलम 370 हटवणे ही सर्वात मोठी उपलब्धी मानत आहेत.