मुंबई,दि.10: PM नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी वंदे भारत एक्स्प्रेसला (Vande Bharat Express) हिरवा झेंडा दाखवला. मुंबई ते सोलापूर आणि मुंबई ते शिर्डी दरम्यान या वंदे भारत एक्स्प्रेस धावणार आहेत. या उद्घाटनानंतर पंतप्रधान मोदी यांनी उपस्थितांना संबोधित केले.
वंदे भारत एक्सप्रेस | Vande Bharat Express
वंदे भारत एक्सप्रेस ही सेमी-हाय स्पीड एसी चेअर कार ट्रेन सेवा आहे. भारतीय रेल्वेची 9वी आणि 10वी वंदे भारत एक्सप्रेस सिद्धेश्वर, शिर्डी आणि त्र्यंबकेश्वर या तीर्थक्षेत्रांना जोडली जाणार आहे. सीएसएमटी स्थानकावरुन नरेंद्र मोदी यांनी सदर गाड्यांना हिरवा झेंडा दाखवला असून यावेळी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील उपस्थित होते.
“देशातील 17 राज्यांती 108 जिल्हे वंदे भारत एक्स्प्रेसने जोडले आहेत. देशात आज नवीन विमानतळ, वंदे भारत एक्सप्रेस आणि मेट्रोचं जाळं वाढवण्याचा प्रयत्न सुरू आहे, असे पंतप्रधान मोदी यावेळी म्हणाले.
रेल्वेच्या क्षेत्रात मोठी क्रांती होत आहे, देशाला आज नववी आणि दहावी वंदे भारत ट्रेन समर्पित करताना माला खूप आनंद होत आहे. आजचा दिवस भारतीय रेल्वे आणि मुंबईच्या कनेक्टिव्हिटीसाठी मोठा दिवस आहे. या दोन्ही वंदे भारत ट्रेन मुंबई आणि पुणे या देशातील मोठ्या शहरांना जोडणार आहेत. यामुळे महाराष्ट्रातील पर्यटन आणि तीर्थक्षेत्रांना चालना मिळेल, अशा विश्वास पंतप्रधान मोदी यांनी व्यक्त केला.
सदर कार्यक्रमावेळी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नरेंद्र मोदींचे आभार मानले. महाराष्ट्रातील पायाभूत सुविधांसाठी केंद्र सरकारचे संपूर्ण सहकार्य असल्याचे एकनाथ शिंदे यांनी सांगितले. तुमच्या आशीर्वादाने सहा महिन्यांपूर्वी सरकार स्थापन झाले, हे सामान्यांचे सरकार आहे, असंही एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले.
सोलापूर-मुंबई वंदे भारत एक्स्प्रेस
ट्रेन क्रमांक 22226 सोलापूर-मुंबई वंदे भारत एक्स्प्रेस सोलापूरहून सकाळी 6.05 वाजता सुटेल आणि 6 तास 30 मिनिटे घेत मुंबईला दुपारी 12.35 वाजता पोहोचेल. यादरम्यान ही ट्रेन कुर्डुवाडी, पुणे, कल्याण आणि दादर स्थानक घेत सीएसएमटी स्थानकावर पोहचेल. तर ट्रेन क्रमांक 22225 मुंबई-सोलापूर वंदे भारत एक्स्प्रेस सायंकाळी 4.05 वाजता सीएसएमटीवरून सुटेल आणि 6 तास 35 मिनिटे घेत सोलापूरला रात्री 10.40 वाजता पोहोचेल. दोन्ही गाड्या आठवड्यातून सहा दिवस धावतील.