EVM विरोधातील याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाचा महत्वाचा निर्णय

0

नवी दिल्ली,दि.15: इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन (ईव्हीएम) संदर्भात दाखल याचिकेवर सुनावणी करण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे. इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीनच्या कामात अनियमितता झाल्याचा आरोप करणारी याचिका फेटाळताना सर्वोच्च न्यायालयाने सांगितले की, ईव्हीएमबाबत किती याचिका दाखल झाल्या आहेत? प्रत्येक पद्धतीचे स्वतःचे सकारात्मक आणि नकारात्मक पैलू असतील, आम्ही अंदाजावर आधारित पुढे जाऊ शकत नाही.

न्यायमूर्ती संजीव खन्ना, न्यायमूर्ती दीपंकर दत्ता आणि न्यायमूर्ती ऑगस्टीन जॉर्ज मसिह यांच्या खंडपीठाने सांगितले की, या न्यायालयाने यापूर्वीच अनेक प्रसंगी अनेक याचिका तपासल्या आहेत आणि ईव्हीएमच्या कामकाजाशी संबंधित विविध मुद्द्यांचा विचार केला आहे.

खंडपीठाने याचिकाकर्त्या नंदिनी शर्मा यांना सांगितले की, “आम्ही किती याचिकांवर विचार करू? अलीकडेच आम्ही VVPAT शी संबंधित एका याचिकेवर विचार केला. आम्ही गृहितकांवर (अंदाजावर) चालवू शकत नाही. प्रत्येक पद्धतीच्या स्वतःच्या सकारात्मक आणि नकारात्मक बाजू असतात. क्षमस्व आम्ही त्यावर कलम ३२ अंतर्गत विचार करू शकत नाही.”

सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने आदेशात म्हटले आहे की, याचिकेत उपस्थित करण्यात आलेला मुद्दा सर्वोच्च न्यायालयाने विविध याचिकांमध्ये तपासला आहे. न्यायमूर्ती खन्ना म्हणाले की, न्यायालयाने या मुद्द्यावर 10 हून अधिक प्रकरणे तपासली आहेत. शर्मा यांनी आपल्या याचिकेत निवडणूक आयोग आणि सहा राजकीय पक्षांना बाजू मांडली होती.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here