मुंबई,दि.३१: राष्ट्रवादीचे नेते मंत्री नवाब मलिक यांनी एनसीबीचे समीर वानखेडे यांनी धर्मांतर करून नोकरी मिळविल्याचा दावा केला होता. समीर वानखेडे मुस्लिम असून त्यांनी दलित म्हणून नोकरी मिळविल्याचा आरोप नवाब मलिक यांनी केला होता. राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे उपाध्यक्ष अरुण हलदर मुंबई दौऱ्यावर आले असताना वानखेडे यांनी त्यांची भेट घेऊन आपल्यावर होत असलेल्या आरोपांबाबत तक्रार दिली.
एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांची जातीसंबंधीची कागदपत्रे मी तपासली आहेत. त्यांनी धर्मांतर केल्याचे सकृतदर्शनी दिसून येत नाही, असे राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे उपाध्यक्ष अरुण हलदर यांनी शनिवारी पत्रकारांशी संवाद साधताना ही माहिती दिली.
अरुण हलदर म्हणाले की, काही लोक कुटुंबावर जातीवरून आरोप करीत असल्याने वानखेडे यांनी आमच्याकडे तक्रार केली आहे. तुम्ही मागसवर्गीय आहात का? असे विचारले असताना त्यांनी हो म्हणून सांगितले, तसेच काही पुरावेही सादर केले आहेत. ड्रग्सच्या विरोधात काम करत आहे, त्याचमुळे काही लोक मला जातीच्या आधारावर माझ्यावर जाणूनबुजून आरोप करत आहेत, असे वानखेडे यांनी सांगितले असल्याचे ते म्हणाले.
त्यांच्याशी बोलताना महार जातीचे असल्याचे मला जाणवले. त्यांचा पहिला विवाह स्पेशल मॅरेज ॲक्टनुसार झाला होता. त्यांचे रेकॉर्डही मी तपासले. त्यांनी धर्मांतर केलेले नाही. मात्र, आपण एकतर्फी निर्णय देणार नाही, असे सांगून ते म्हणाले, आमच्याकडे त्यांच्या जातीबाबत कोणी तक्रार केल्यास आम्ही त्याची चौकशी करू. या प्रकरणात महाराष्ट्र सरकार काय करते ते पाहू. त्यानंतर राष्ट्रीय मागासवर्ग आयोग आपले काम करेल, असेही त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, वानखेडे यांनी त्यांची भेट घेऊन सुमारे तासभर चर्चा केली. जात प्रमाणपत्रासह अनेक कागदपत्रे आणि एक निवेदनही हलदर यांना दिले, तर याबाबत वानखेडे यांनी भाष्य करण्यास नकार दिला.