मुंबई,दि.8: आज लोकसभेच्या निवडणुका झाल्यास भाजपाला किती जागा मिळणार? ही माहिती सर्व्हेमधून समोर आली आहे. टाईम्स नाऊ-मॅट्रीझच्या सर्व्हेमधून महत्वाची माहिती समोर आली आहे. टाईम्स नाऊ-मॅट्रीझने महाराष्ट्रासह देशात सर्व्हे केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणात भाजपाला 370 तर एनडीएला 400 पेक्षा जास्त जागा मिळतील, असा दावा केला.
महाराष्ट्रात अजित पवार गट व एकनाथ शिंदे गट भाजपाबरोबर सत्तेत सहभागी आहे. ज्या राज्यांत ताकद कमी पडत होती तिथे भाजपाने साम, दाम, दंड, भेद वापरून फोडाफोडी केली आहे. महाराष्ट्र, बिहार ही त्याची ताजी उदाहरणे आहेत. अशातच सर्हेमधून माहिती समोर आली आहे.
भाजपाला मिळणार इतक्या जागा
लोकसभा निवडणुकीसंदर्भात टाईम्स नाऊ नवभारतच्या सर्वेनुसार, भाजप सर्वात मोठा पक्ष होणार आहे. परंतु एनडीएला 400 च्या लक्ष्यापेक्षा थोड्या कमी जागा मिळणार आहे, असे सर्वेक्षणात दिसत आहे. या सर्वेनुसार एनडीएला 366 जागा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. सर्वेक्षणात इंडिया आघाडीला 104 जागा आणि इतरांना 73 जागा मिळणार आहे. तसेच एप्रिलमध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीला अजून तीन महिने बाकी आहेत. यामुळे एनडीएचे 400 चे लक्ष्य गाठता येईल, असा अंदाज ताज्या सर्वेक्षणातून व्यक्त करण्यात आला आहे.
महाराष्ट्रात लोकसभेच्या एकूण 48 जागांपैकी भाजपा-अजित पवार राष्ट्रवादी आणि एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला 39 जागा मिळताना दिसत आहे. तर उद्धव ठाकरे शिवसेना, शरद पवार राष्ट्रवादी आणि काँग्रेसला ९ जागा मिळताना दिसत आहेत. नितीशकुमारांच्या बिहारमध्ये एनडीए: 35, I.N.D.I.A: 5 जागा मिळताना दिसत आहेत. नितीशकुमार भाजपात आल्याने परिस्थिती बदलली आहे. उत्तराखंड भाजपाला पाचपैकी पाच, मध्य प्रदेशमध्ये एनडीएला २९ पैकी 28 आणि काँग्रेसला १ जागा मिळताना दिसत आहे. हिमाचल प्रदेश भाजपाला ४ पैकी ३ जागा तर काँग्रेसला १ जागा मिळताना दिसत आहे. दिल्लीमध्ये भाजपाला ७ पैकी सात जागा मिळताना दिसत आहेत. पंजाबमध्ये १३ पैकी आप ०५, भाजप ०३, काँग्रेस ०३, SAD 01 जागा मिळताना दिसत आहे.