Solapur: जिल्हाधिकारी आशीर्वाद यांची विमानतळ आणि आयटी पार्क संदर्भात महत्वाची माहिती 

0

सोलापूर,दि.१९: Solapur: जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद (IAS Kumar Ashirwad) यांनी बोरामणी विमानतळ आणि आयटी पार्क संदर्भात महत्वाची माहिती दिली आहे. बोरामणी येथे नियोजित आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी आवश्यक असलेली 33 हेक्टर जमीन मिळविण्यासाठी केंद्रीय वन विभागाकडे नव्याने प्रस्ताव पाठविला जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली.

सोलापूर जिल्ह्याच्या विकासासाठी अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या बोरामणी आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या कामाला पुन्हा गती मिळण्याची चिन्हे आहेत. बोरामणी विमानतळाची संकल्पना तत्कालीन केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे (Sushilkumar Shinde) यांच्या प्रयत्नांतून मूर्त रूपाला आली होती. त्यावेळी मोठ्या प्रमाणावर भूसंपादनही करण्यात आले.

मात्र, विमानतळासाठी आवश्यक असलेली काही जमीन माळढोक  पक्ष्याच्या संवर्धनासाठी राखीव असल्याने 2021 मध्ये केंद्रीय वन विभागाने परवानगी नाकारली होती.आता पुन्हा 33 हेक्टर जमिनीचा प्रस्ताव केंद्राकडे सादर केला जाणार आहे.

त्याबदल्यात विमानतळ परिसरातील महाराष्ट्र शासनाची जागा वन विभागाला देण्याची तयारी आहे. पुढील दोन दिवसांत हा प्रस्ताव पाठविण्यात येईल असे जिल्हाधिकारी आशिर्वाद यांनी सांगितले.

सध्याच्या होटगी रोडवरील विमानतळावर नाईट लँडींग सुविधा नाही. त्यामुळे मोठ्या विमानांची उड्डाणे शक्य नाहीत. आंतरराष्ट्रीय दर्जाचे हवाईसेवा केंद्र सुरू करण्यासाठी बोरामणी हेच एकमेव योग्य ठिकाण असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी नुकतीच जिल्हाधिकारी यांच्याकडून सविस्तर माहिती घेतली होती.

आयटी पार्कसाठी स्वतंत्र बैठक

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी  रविवारी सोलापूर दौर्‍यात आयटी पार्क उभारण्याची घोषणा केली. त्यानुसार जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी  येत्या  22 ऑगस्ट रोजी महत्त्वाची बैठक बोलावली आहे. या बैठकीत एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांसमवेत शासकीय जागा कुठे उपलब्ध होऊ शकतील, तसेच गरज पडल्यास खासगी जमीन भूसंपादनाचा पर्याय यावरही चर्चा केली जाणार आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here