सुरत,दि.22: Hijab Controversy: हिजाब (Hijab Controversy) वरून कर्नाटकात वाद सुरू आहे. हिजाब प्रकरणी न्यायालयात सुनावणी सुरू आहे. हिजाबचा (Hijab) वाद अनेक ठिकाणी होत आहे. गुजरात सुरतमधील एका शाळेत मुस्लीम मुली हिजाब घालून आल्याने हिंदू संघटनेने निषेध नोंदवला आहे. वाद वाढू नये म्हणून पोलिसांनी संघटनेच्या 15 कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. वातावरण बिघडू नये म्हणून पोलिसांनी आजूबाजूच्या परिसरातही बंदोबस्त वाढवला आहे.
ही घटना सुरतमधील वराछा येथील पीपी सवानी शाळेत घडली. येथे मंगळवारी 4 ते 5 मुस्लीम मुली हिजाब परिधान करून परीक्षा देण्यासाठी आल्या होत्या. काही विद्यार्थ्यांनी याचा व्हिडिओ तयार करून तो विश्व हिंदू परिषदे (VHP)च्या कार्यकर्त्यांना पाठवला. यानंतर काही वेळातच विहिंपचे लोक शाळेत पोहोचले आणि त्यांनी विरोध दर्शवला. हे कार्यकर्ते शाळेत पोहोचल्यानंतर मुख्याध्यापकांना बोलण्यासाठी त्यांच्या कार्यालयातही गेले. यानंतर शाळेत वाद सुरू झाला. नंतर काही वेळातच पोलीसही तेथे पोहोचले आणि त्यांनी विहिंपच्या 15 कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.
शाळेत पोहोचलेले विश्व हिंदू परिषदेचे नेते निलेश अकबरी म्हणाले, गुजरातला शाहीनबाग बनवण्याचा प्रयत्न सुरू आहे. शाळेत ड्रेस कोडचा नियम फॉलो का केला जात नाही, असा सवाल आम्ही मुख्याधापकांना केला आहे.
कर्नाटकात गेल्या महिन्यात हिजाबचा वाद सुरू झाला होता, उडुपी येथील एका सरकारी महाविद्यालयाच्या क्लासमध्ये 6 विद्यार्थिनी हिजाब परिधान करून आल्या होत्या. खरे तर, महाविद्यालय प्रशासनाने विद्यार्थिनींना हिजाब परिधान करून येण्यास मनाई केली होती. मात्र, तरीही या विद्यार्थिनी हिजाब परिधान करून आल्या होत्या. यामुळे हा वाद वाढला होता. तेव्हापासूनच देशातील इतर शाळा अथवा महाविद्यालयांमध्ये हिजाबवरून वाद सुरू झाला आहे.