जळगाव,दि.१२: Gulabrao Patil: शिवसेना नेते राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Raghunath Patil) यांनी मतदारांच्या हुशारीचं कौतुक वेगळ्या पद्धतीने केले. मंत्री गुलाबराव पाटील यांनी आज आपल्या खास शैलीत पुन्हा एकदा फटकेबाजी केली. ‘मतदार हे फार हुशार असतात. ते कधी काय करतील सांगता येत नाही. संधी मिळाली की ते कुणाचं मटण खातील आणि कुणाचं बटण दाबतील हे कळतही नाही, असं पाटील म्हणाले.
गुलाबराव पाटील यांच्या हस्ते भुसावळ येथील रस्त्याच्या कामाचं भूमिपूजन आज झालं. त्यावेळी त्यांनी आपल्या खास ग्रामीण शैलीत उपस्थितांनी संवाद साधला. मतदारांच्या हुशारीचंही त्यांनी कौतुक केलं. ‘मतदार हे कामाचं मूल्यमापन करत असतात. निवडणूक लागली की सकाळी शिवसेनेचं मटण खातात, दुपारी भाजपची शेवभाजी खातात. रात्री काँग्रेसचं जेवण करतात. खातात कुणाचं मटण आणि दाबतात कुणाचं बटण हेच कळत नाही, असं ते म्हणाले.
त्या विधानावर खुलासा
माझ्या मतदारसंघातील रस्ते अभिनेत्रीच्या गालासारखे गुळगुळीत असल्याचं वक्तव्य पाटील यांनी नगरपंचायत निवडणुकीच्या प्रचारादरम्यान केलं होतं. त्यावर आज त्यांनी पुन्हा एकदा खुलासा केला. खराब रस्ते चांगले करण्याचा प्रयत्न करत असल्याचं सांगताना मी जे बोलून गेलो, त्यातून कुणाचेही मन दुखवण्याचा माझा हेतू नव्हता. मागच्या भाषणावेळी माझ्या शब्दांचा विपर्यास केला गेला. वृत्तवाहिन्यांनी माझं ते वक्तव्य प्रचंड चालवलं. त्यामुळं आता तो गाल सोडला आणि ओम पुरीचा गाल पकडलाय. आता त्यावरून तरी कोणी टीका करू नये, अशी मिश्किल टिप्पणी त्यांनी केली. त्यांच्या या वक्तव्यावरही हंशा पिकला.