अहमदाबाद,दि.8: Gujarat Election Result 2022: भाजपा (BJP) 20 वर्षांपूर्वीचा आपलाच विक्रम मोडणार आहे. भाजपाची विक्रमी विजयाकडे वाटचाल सुरू आहे. गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजपा अभुतपूर्व यश मिळवणार आहे. गुजरात मध्ये भाजपा सातव्यांदा सत्ता स्थापन करणार आहे. गुजरातमधील सर्व 182 विधानसभा जागांचे कल समोर आले आहेत. समोर आलेल्या कलांनुसार, भाजपनं (BJP) बहुमताचा आकडा पार केला आहे.
Gujarat Election Result 2022 | गुजरातमध्ये भाजपा आघाडीवर
भाजपा सध्या 147 जागांवर आघाडीवर आहे. तर दुसरीकडे गुजरातमध्ये (Gujarat) काँग्रेसची (Congress) दाणादाण उडाल्याचं पाहायला मिळत आहे. कलांनुसार, काँग्रेस 21 जागांवर आघाडीवर आहे. तसेच, गुजरातमध्ये पहिल्यांदाच सर्व जागा लढवणारा आम आदमी पक्षही (AAP) 10 जागांवर आघाडीवर आहे, तर 4 जागांवर इतर पक्ष, अपक्ष आघाडीवर आहेत.
Gujarat Election Result 2022 | भाजपाला 2017 पेक्षा 48 जागांचा फायदा
2017 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपला 99 जागा मिळाल्या होत्या. आकडेवारीनुसार, यावेळी भाजपला 48 जागांचा फायदा होताना दिसत आहे. तर दुसरीकडे काँग्रेसची पूर्णपणे वाताहात झाल्याचं पाहायला मिळत आहे. काँग्रेसनं 2017 मध्ये विधानसभेच्या 77 जागांवर विजय मिळवला होता, मात्र यावेळी काँग्रेस केवळ 21 जागांवर आघाडीवर असल्याचं पाहायला मिळत आहे. काँग्रेसला 57 जागांचे नुकसान होत असल्याचं पाहायला मिळत आहे.

भाजपा विक्रम मोडणार | Gujarat Election Result 2022
गुजरातमध्ये गेल्या 27 वर्षांपासून भाजपची सत्ता आहे. यावेळी भाजप विक्रमी विजयासह सरकार स्थापन करणार असल्याचं दिसत आहे. यापूर्वी 2002 मध्ये भाजपनं बहुमताचा आकडा पार केला होता. 2002 च्या निवडणुकीत भाजपला 127 जागा मिळाल्या होत्या. तर, यावेळी हा आकडा 150 च्या जवळ पोहोचला आहे. त्यामुळे भाजप 2002 मधील स्वतःचाच रेकॉर्ड मोडण्याच्या तयारीत आहे. 2002 मध्ये नरेंद्र मोदींनी दुसऱ्यांदा गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली होती.
भाजपाला आप’मुळे फायदा?
गुजरात विधानसभा निवडणुकीचे कल पाहता आम आदमी पार्टीमुळे काँग्रेसला मोठा फटका बसल्याचं पाहायला मिळत आहे. गुजरातमध्ये ‘आप’ 10 जागांवर आघाडीवर असून निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवरील आकड्यांनुसार, गुजरातमध्ये ‘आप’ला 13 टक्क्यांहून अधिक मतं मिळाली आहेत. तसेच, काँग्रेसला आतापर्यंत 26.5 टक्के मतं मिळाली आहेत. काँग्रेसची मतं ‘आप’कडे वळली असून त्याचा थेट फायदा भाजपला झाल्याचं मानलं जात आहे.
दोन टप्प्यात झाली होती निवडणूक
दरम्यान, गुजरातमध्ये दोन टप्प्यात निवडणूक पार पडली होती. 1 डिसेंबरला गुजरात निवडणुकीचा पहिला टप्पा पार पडला तर 5 डिसेंबरला दुसरा टप्पा पार पडला. आणि या दोन्ही टप्प्यांचा निकाल आज जाहीर केला जाणार आहे. सध्या मतमोजणी सुरु आहे. पहिल्या टप्यात 89 जागांसाठी मतदान पार पडलं होतं. तर दुसऱ्या टप्यात 93 जागांसाठी मतदान पार पडलं होतं. एकूण 182 जागांवर निवडणूक पार पडली.