मुंबई,दि.३०: गुलियन बॅरी सिंड्रोममुळे (Guillain Barre Syndrome) देशात तिसरा मृत्यू झाला आहे. पश्चिम बंगालमधील कोलकाता येथील नील रतन सरकारी रुग्णालयात दाखल झालेल्या उत्तर २४ परगणा जिल्ह्यातील १२ वीच्या विद्यार्थ्याचा कोलकाता येथील एनआरएस मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला.
सेप्टिक शॉक आणि मायोकार्डिटिसमुळे विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याचे रुग्णालयाने सांगितले. डॉक्टरांचा असा अंदाज आहे की त्याचा मुळ रोग गुलियन बॅरी सिंड्रोम असू शकतो.
127 प्रकरणे नोंदवली | Guillain Barre Syndrome
आज याआधी, महाराष्ट्रातील पुण्यात गुलियन बॅरी सिंड्रोममुळे मृत्यू झाला होता. यापूर्वी पुण्यातच या सिंड्रोममुळे एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता. आत्तापर्यंत या सिंड्रोमचे १२७ प्रकरणे समोर आली आहेत. ही सतत वाढत जाणारी संख्या पाहता 200 रक्ताचे नमुने एनआयव्ही पुणे येथे पाठविण्यात आले आहेत.
आरोग्य विभागाने घेतली बैठक
दरम्यान, पश्चिम बंगालच्या आरोग्य विभागाने गुइलेन बॅरी सिंड्रोम (जीबीएस) संदर्भात एक बैठक घेतली, ज्यामध्ये आरोग्य सचिव आणि इतर अधिकारीही सहभागी झाले होते. या बैठकीत राज्यातील सर्व शासकीय आणि जिल्हा रुग्णालयांना जीबीएसचे कोणतेही प्रकरण आढळल्यास तातडीने आरोग्य विभागाला अहवाल देण्याच्या सूचना देण्यात आल्या.
प्लाझ्मा थेरपी, वेंटिलेशन सपोर्ट सिस्टीम आणि इंट्राव्हेनस इम्युनोग्लोब्युलिन इंजेक्शन्ससह आवश्यक उपचारांची उपलब्धता सुनिश्चित करण्याचे आणि या उपचारांसाठी पुरेशा पायाभूत सुविधांचा साठा करण्याचे निर्देशही आरोग्य विभागाने रुग्णालयांना दिले आहेत.