सोलापूर,दि.3: सोलापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी उजनी प्रकल्पातून पाण्याचे नियोजन कसे असेल याची माहिती दिली आहे. सोलापूर लाभक्षेत्र विकास प्राधिकरण अंतर्गत उजनी प्रकल्पात दिनांक 2 नोव्हेंबर 2023 अखेर 29.33 उपयुक्त पाणीसाठा तर 63.66 मृत पाणीसाठा असा एकूण 92.99 टीएमसी पाणीसाठा उपलब्ध आहे. या उपलब्ध पाणी साठ्यातून रब्बीचे व पिण्याच्या पाण्याचे दोन आवर्तन माहे फेब्रुवारी 2024 अखेरपर्यंत पुरेसा राहील या पद्धतीने पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दिली.
उजनी प्रकल्पातील उपलब्ध पाण्याच्या नियोजनाबाबत कालवा सल्लागार समितीच्या दूरदृश्यप्रणाली व्दारे आयोजित बैठकीत पालकमंत्री पाटील बोलत होते. यावेळी आमदार सर्वश्री बबनदादा शिंदे, संजयमामा शिंदे, समाधान आवताडे, सुभाष देशमुख, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील हे दूरदृश्य प्रणाली द्वारे उपस्थित होते तर जिल्हाधिकारी कार्यालय येथून जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे, उपजिल्हाधिकारी महसूल विठ्ठल उदमले, जलसंपदाचे अधीक्षक अभियंता धीरज साळी, कार्यकारी संचालक कोल्हे, उजनी धरण व्यवस्थापन प्रकल्पाचे मोरे, भीमा कालवा मंडळाचे अधीक्षक अभियंता बागडे यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.
रब्बी हंगामासाठी असे असेल नियोजन
पालकमंत्री चंद्रकांत पाटील पुढे म्हणाले की, जलसंपदा विभागाने रब्बी हंगाम 2023-24 व पिण्याच्या पाण्यासाठी उजनी प्रकल्पातून दिनांक 4 नोव्हेंबर 2023 पासून पाणी सोडणेबाबत नियोजन केले असून त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी, पाण्याचा अपव्यय होणार नाही यासाठी योग्य ती दक्षता घ्यावी. त्याचप्रमाणे पाणी सोडल्यानंतर आजूबाजूच्या परिसरातील वीज खंडित करावी जेणेकरून शेवटच्या ठिकाणापर्यंत पाणी पोहोचेल असेही त्यांनी सांगितले.
तसेच हे पाणी आवर्तन सोडण्याचे नियोजन माहे फेब्रुवारी 2024 अखेर पर्यंत चे असून त्यानंतरचे पाणी नियोजन कशा पद्धतीने करावयाचे याबाबत जानेवारी अखेरपर्यंत कालवा समितीची पुन्हा बैठक घेण्यात येणार असल्याचे पालकमंत्री पाटील यांनी सांगितले.
खरीप हंगाम 2023-24 मधील पाणी वापर
खरीप हंगाम 2023-24 मधील प्रत्यक्ष पाणी वापर जलाशयाच्या वरील बाजूचा पाणी वापर 6.64 खालील बाजूचा पाणी वापर 5.45 टीएमसी असा एकूण 12.09 टीएमसी पाणी वापर झालेला आहे.
रब्बी हंगाम 2023-24 मधील प्रत्यक्ष पाणी वापर
रब्बी हंगाम 2023-24 मधील दिनांक 2 नोव्हेंबर 2023 पर्यंतचा प्रत्यक्ष पाणी वापर हा जलाशयाच्या वरील बाजूचा 2.60 टीएमसी तर जलाशयाच्या खालील बाजूचा 0.56 टीएमसी असा एकूण 3.16 टीएमसी झालेला आहे.
उर्वरित रब्बी हंगाम 2023-24 चे पाणी नियोजन
दिनांक 2 नोव्हेंबर 2023 रोजी उजनी प्रकल्पातील पाण्याची पातळी 494.580 मीटर इतकी आहे तर एकूण पाणीसाठा 92.99 टीएमसी, उपयुक्त पाणीसाठा 29.33 टीएमसी तर उपयुक्त पाणी साठेची टक्केवारी 54.75 टक्के आहे, अशी माहिती प्रकल्पाचे अध्यक्ष अभियंता धीरज साळी यांनी दिली.
उजनी प्रकल्पातून दिनांक 2 नोव्हेंबर 2023 ते 29 फेब्रुवारी 2024 या कालावधीत जलाशयाच्या वरील बाजूचा पाणी वापर व जलाशयाच्या खालील बाजूचा पाणी वापर करण्याचे नियोजन केलेले आहे. वरील बाजूचा पाणी वापर 11.92 टीएमसी तर खालील बाजूचा पाणी वापर 32.35 टीएमसी असा एकूण 44.27 टीएमसी इतका पाणी वापर उपरोक्त कालावधीत केला जाणार असल्याची माहिती साळी यांनी दिली.
अ) जलाशयाच्या वरील बाजूचा पाणी वापर
बाष्पीभवन 2.66 टीएमसी, जलाशय उपसा सिंचन 1.72, जलाशय बिगर सिंचन पिण्यासाठी 0.83, जलाशय बिगर सिंचन औद्योगिक 0.58, जलाशयातील गाळ 2.26, सीना माढा उपसा सिंचन योजना आवर्तन एक व दोन 2.84 टीएमसी, दहिगाव उपसा सिंचन योजना आवर्तन एक व दोन 1.03 टीएमसी असा एकूण 11.92 टीएमसी पाणी वापराचे नियोजन दिनांक 2 नोव्हेंबर 2023 ते 29 फेब्रुवारी 2024 या कालावधी केले आहे.
ब) जलाशय खालील बाजूचा पाणी वापर नियोजन
1) कालवा प्रवाही सिंचन आवर्तन 1 (मान नदीवरील सात कोल्हापूर बंधारे व सीना नदीवरील नऊ कोल्हापूर बंधाऱ्याच्या फीडिंगसह) कालावधी 4 नोव्हेंबर ते 14 डिसेंबर, 8 टीएमसी पाणी सोडण्यात येणार.
2) कालवा प्रवाही सिंचन आवर्तन एक जानेवारी 2024 ते 10 फेब्रुवारी 2024 या कालावधीत 7 टीएमसी पाणी सोडण्यात येणार.
3) भीमा सीना जोड कालवा आवर्तन एक व दोन 4 नोव्हेंबर 2023 ते 4 फेब्रुवारी 2024 या कालावधीत 6.35 टीएमसी पाणी सोडण्यात येणार.
4) भीमा नदी आवर्तन (सोलापूर शहरासाठी) 1 डिसेंबर 2023 ते 10 डिसेंबर 2023 या कालावधीत 5 टीएमसी तर भीमा नदी आवर्तन (सोलापूर शहरासाठी हिळ्ळी कोल्हापूर पद्धतीचा बंधाऱ्यापर्यंत 1 फेब्रुवारी 2024 ते 10 फेब्रुवारी 2024 या कालावधीत 6 टीएमसी पाणी सोडण्यात येणार आहे, असा एकूण 32.35 टीएमसी पाणी वापर खालील बाजूचा होणार असून जलाशयाच्या वरील व खालील बाजूचा एकूण रब्बी हंगाम पाणी वापर 44.27 टीएमसी असा राहील, अशी माहिती अधीक्षक अभियंता साळी यांनी दिली.
उर्वरित रब्बी हंगामाचे नियोजन झाल्यानंतर 29 फेब्रुवारी 2024 अखेर प्रकल्पाची पाणी पातळी ४८८.६३५ मीटर असेल तर एकूण पाणीसाठा 48.72 टीएमसी, उपयुक्त पाणीसाठा वजा 14.95 टीएमसी तर उपयुक्त पाण्यासाठी ची टक्केवारी वजा 27.90% इतकी राहील.