Gold Reserves: भारतातील सर्वांत मोठ्या सोन्याच्या साठ्याचा शोध मुंग्यांमुळे लागला

0

मुंबई,दि.30: Gold Reserves: मुंग्या (Ants) लहान असल्या तरी बलाढ्य असतात. मुंग्यांच्या बाबतीत हत्तीची गोष्ट अनेकांना माहिती आहे किंवा आवर्जून सांगितली जाते. मुंग्यांच्या सामर्थ्याची ही गोष्ट आता आणखी एका उदाहरणाने सिद्ध झाली आहे. मुंग्यांनी आपल्या देशातला सर्वांत मोठा सुवर्णसाठा (Indias Largest Gold Reserve) शोधून काढला आहे. बिहारमधल्या जमुई (Bihar Jamui) जिल्ह्यातल्या ललमटिया व करमटिया या भागांमध्ये देशातला सर्वांत मोठा सोन्याचा साठा असल्याची माहिती केंद्र सरकारनं दिली आहे. न्यूज 18ने यासंदर्भात वृत्त दिले आहे.

देशातल्या सोन्याच्या एकूण साठ्यापैकी 44 टक्के सोनं या दोन प्रदेशांमध्ये आहे. काही दिवसांपूर्वीचं केंद्रीय कोळसा आणि खाण मंत्री प्रल्हाद जोशी (Minister Pralhad Joshi) यांनी संसदेत याबाबत माहिती दिली. ज्या ठिकाणी आतापर्यंत फक्त नक्षलवाद्यांच्या बंदुकांचे आवाज ऐकायला मिळत होते, त्या ठिकाणी आता सोनं मिळणार आहे. सोन्याचा हा साठा एका वेगळ्याच कारणामुळे जास्त चर्चेत आहे. जमुईत लाल मातीखाली दडलेला एवढा मोठा सोन्याचा साठा कुठल्या शास्त्रज्ञानं नाही, तर मुंग्यांनी शोधला आहे. तो पूर्णपणे शोधण्यासाठी 40 वर्षं लागली असली, तरी आता सरकारने देशातला सोन्याचा सर्वांत मोठा साठा असण्याला दुजोरा दिला आहे.

न्यूज 18ने दिलेल्या वृत्तानुसार रहिवाशांच्या म्हणण्यानुसार, सोन्याचा साठा असल्याची माहिती पहिल्यादा मुंग्यांनीच दिली. साधारण चार दशकांपूर्वीही मेंढपाळ (Shepherd) उन्हापासून बचाव करण्यासाठी एका मोठ्या वटवृक्षाखाली एकत्र येत असत. त्या झाडाजवळ मुंग्या स्वतःचं घर म्हणजे वारूळ तयार करत होत्या. त्यासाठी त्यांनी मातीचे कण गोळा केले होते. मेंढपाळांची नजर या मातीच्या कणांवर पडली तेव्हा ते कण सर्वसामान्य नसल्याचं त्यांना जाणवलं. कारण मातीचे कण उन्हामध्ये सोन्याप्रमाणे चमकत होते. चमकणाऱ्या मातीची गावामध्ये जोरदार चर्चा झाली. त्यानंतर ही गोष्ट प्रशासनापर्यंत गेली. चमकणाऱ्या मातीची माहिती मिळाल्यानंतर पुरातत्त्व विभागाला (Department of Archeology) पाचारण करण्यात आलं आणि अशा प्रकारे देशातला सर्वांत मोठा सोन्याचा साठा प्रकाशझोतात आला.

आता गावात जितकी तोंडं तितक्या वेगवेगळ्या गोष्टी ऐकायला मिळतात; मात्र एक गोष्ट नक्की आहे, की या ठिकाणी सोन्याचा सर्वांत मोठा साठा आहे. कारण सोन्याचा शोध सुरू झाल्यानंतर तब्बल चाळीस वर्षांनी सरकारने देखील ही गोष्ट मान्य केली आहे. सोन्याचा साठा आढळल्यामुळे ‘करमटिया’ गावाला स्थानिक नागरिकांनी आता ‘सोनमटिया’ असं म्हणण्यास सुरुवात केली आहे. या ठिकाणी 223 दशलक्ष टन सोनं असल्याचा अंदाज आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here