सोलापूर,दि.९: सोलापूर महानगरपालिकेकरिता १५ जानेवारीला मतदान होणार आहे तर १६ जानेवारीला मतमोजणी होणार आहे. सोलापुरातील प्रभाग क्रमांक २६ मधील गणेश बिल्डर्स स्किम नं ३, अमोल नगर तसेच लोखंडवाला पार्कमधील नागरिकांनी मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. गणेश बिल्डर्स सोसायटीत ९० पेक्षा जास्त कुटुंबे राहत आहेत. मात्र येथील नागरिकांना रस्ता नसल्याने मोठ्या समस्यांचा सामना करावा लागत आहे.
रस्ता नसल्याने घंटागाडी, रुग्णवाहिका सोसायटीत येऊ शकत नाही. येथील नागरिकांनी आमदार, खासदार यांना निवेदन देऊनही आजपर्यंत कोणत्याही लोकप्रतिनिधींनी याकडे लक्ष न दिल्याने येथील नागरिकांनी संताप व्यक्त करत मतदान न करण्याचा निर्णय घेतला आहे.
गणेश बिल्डर्स स्कीम नंबर तीन, अमोल नगर तसेच लोखंडवाला पार्क हा भाग नागरी सुविधांपासून वंचित असून येणाऱ्या महानगरपालिका निवडणूकीवर येथील मतदारांनी बहिष्कारा टाकण्याचा निर्णय घेतला आहे.

यासंदर्भात तीनही वसाहतीमधील नागरिकांनी महापालिका आयुक्त तथा मुख्य निवडणूक अधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांना निवेदन देऊन आपली मागणी मांडली आहे. गेल्या तीस वर्षापासून या वसाहतींना जाण्यायेण्यासाठी चांगला रस्ता नाही. ड्रेनेज लाईनची सुविधा नसल्याने गणेश बिल्डर्स स्कीम नंबर ३, अमोलनगर, लोखंडाला पार्क येथील नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर हाल होत आहेत.
यापूर्वी महापालिका आयुक्त, नगररचना अधिकारी, आमदार, खासदार यांना वारंवार भेटून निवेदन देऊनही दखल घेतली गेली नाही. नगररचना अधिकाऱ्यांनी या भागाची स्वतः पाहणी केली आहे. परंतु अद्याप रस्ता व ड्रेनेज लाईन झालेली नाही. त्यामुळे येथील नागरिकांनी यंदाच्या १५ जानेवारी रोजी होणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीच्या मतदानावर बहिष्कार टाकण्याचे निर्णय घेतला आहे, असे या भागातील नागरिक नंदकुमार जोशी यांनी सांगीतले.








