Gajanan Kirtikar: खासदार गजानन किर्तीकर यांचा एकनाथ शिंदे गटात प्रवेश

0

मुंबई,दि.12: शिवसेना (ठाकरे गट) खासदार गजानन किर्तीकर (Gajanan Kirtikar) यांनी एकनाथ शिंदे गटात प्रवेश केला आहे. शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. शिवसेनेला लागलेली गळती अद्यापही सुरू असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. मुंबईतून शिवसेना नेते आणि खासदार गजानन किर्तीकर यांनी एकनाथ शिंदे यांच्या बाळासाहेबांची शिवसेना या पक्षात प्रवेश केला आहे. गजानन किर्तीकर यांनी वर्षा बंगल्यावर जाऊन एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. त्यानंतर रविंद्र नाट्य मंदिर येथील एका कार्यक्रमात गजानन किर्तीकर यांनी शिंदे गटामध्ये प्रवेश केला आहे. गजानन किर्तीकर यांचा शिंदे यांना पाठिंबा हा उद्धव ठाकरेंना मोठा धक्का मानला जातोय. कारण, पुढील काही दिवसांमध्ये मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका होणार आहेत. त्यापूर्वी आणखी एक खासदाराने पक्ष सोडणं, पक्षासाठी घातक ठरू शकते.

दक्षिण – मध्य मुंबईचे खासदार, लोकसभा गटनेते राहुल शेवाळे आणि माहीमचे आमदार सदा सरवणकर यांच्या पुढाकाराने, शिवसैनिक आणि मुंबईतील जनतेच्या वतीने, काल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा भव्य नागरी सत्कार झाला. या कार्यक्रमात गजानन किर्तीकर, रामदास कदम, राहुल शेवाळे उपस्थित आहेत. या कार्यक्रमापूर्वी खासदार गजानन किर्तीकर यांनी शिंदे गटात प्रवेश केला.

दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी 40 आमदारांना सोबत घेत शिवसेनेतून बंडखोरी केली. त्यानंतर शिवसेना पक्ष आणि चिन्हावर दावा केला आहे. हे प्रकरण कोर्टात प्रलंबित आहे. पण निवडणूक आयोगानं पक्षाचं नाव आणि चिन्ह गोठवलं आहे. शिवसेनेच्या 12 खासदारांनीही शिंदे यांना पाठिंबा दिला. त्यानंतर आता गजानन किर्तीकर यांनीही शिंदेंना पाठिंबा दिला आहे. शिवसेनेचे लोकसभेचे 13 खासदार शिंदे गटात सामील झाले आहेत.

शिंदे गटात सामील झाले खासदार कोणते?

  1. राहुल शेवाळे
  2. भावना गवळी
  3. कृपाल तुमने
  4. हेमंत गोडसे
  5. सदाशिव लोखंडे
  6. प्रतापराव जाधव
  7. धर्यशिल माने
  8. श्रीकांत शिंदे
  9. हेमंत पाटील
  10. राजेंद्र गावित
  11. संजय मंडलिक
  12. श्रीरंग बारणे
  13. गजानन किर्तिकर

उद्धव ठाकरे यांच्यासोबत कोण राहिले ?

उद्धव ठाकरे यांच्यासोबत असलेल्या खासदारांमध्ये संजय जाधव (परभणी), ओमराजे निंबाळकर (उस्मानाबाद), अरविंद सावंत (मुंबई दक्षिण), विनायक राऊत (रत्नागिरी सिंधुदुर्ग), राजन विचारे (ठाणे) यांचा समावेश आहे. तर, दादरा नगर हवेलीच्या खासदार कलाबेन डेलकर या शिवसेनेत असल्या तरी तांत्रिक कारणास्तव त्यांना शिवसेनेचे निवडणूक चिन्ह मिळाले नव्हते. आमदारांमध्ये आदित्य ठाकरे, सुनील प्रभू, रविंद्र वायकर, प्रकाश फातर्पेकर, संजय पोतनीस, नितीन देशमुख, वैभव नाईक, भास्कर जाधव, कैलास पाटील, सुनिल राऊत, रमेश कोरगावंकर, अजय चौधरी, राजन साळवी यांचा समावेश आहे.

गजानन किर्तीकर शिवसेनेच्या स्थानीय लोकाधिकार समितीचे अध्यक्ष आहेत. त्यामुळे किर्तीकर शिंदेंबरोबर गेल्यास शिवसेनेची महत्त्वाची संघटना असलेली स्थानिय लोकाधिकार समितीदेखील शिंदे गटाबरोबर जाऊ शकते. त्याचा मोठा फायदा शिंदे गटाला होऊ शकतो. त्याशिवाय, गजानन किर्तीकर हे जुन्या पिढीतील शिवसैनिक आहेत. तेदेखील शिंदे यांच्यासोबत गेल्यास जुन्या शिवसैनिकांमध्ये उद्धव ठाकरे यांच्याविरोधात वातावरण निर्माण होऊ शकते. किर्तीकर हे पक्षाच्या नेतेपदी असल्याने शिवसेना कार्यकारणीत फूट पडली असल्याचे समोर येईल. त्याचा फायदा शिंदे गटाला निवडणूक आयोगासमोरील आपलाच पक्ष खरा असल्याचे सिद्ध करण्यास होऊ शकतो, असे जाणकार सांगतात.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here